कौतुकास्पद ! मातेसाठी सरसावले दुर्मिळ ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ रक्तगटाचे दाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 03:25 PM2020-09-14T15:25:17+5:302020-09-14T15:28:51+5:30
राज्यभरात झाला दुर्मिळ रक्तगटाच्या दात्यांचा शोध
औरंगाबाद : तुम्हाला ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ हा रक्तगट माहीत आहे? आपल्यापैकी बहुतेकांना कदाचित या अत्यंत दुर्मिळ रक्तगटाविषयी माहितीच नसेल; परंतु हा रक्तगट उपलब्ध नसतानाही प्रसूती यशस्वी करण्याची किमया घाटीतील डॉक्टरांनी केली. मात्र, प्रसूतीनंतर अवघ्या एक दिवसाच्या मुलीच्या मातेला या रक्ताची नितांत गरज पडलीच आणि राज्यभरातील; पण मोजकेच असलेले दाते या मातेसाठी सरसावले.
जालना जिल्ह्यातील मनीषा सोनवणे यांची शनिवारी घाटीत प्रसूती झाली आहे. नवजात मुलीची प्रकृत्ती उत्तम आहे; परंतु मनीषा सोनवणे यांची प्रकृती नाजूक आहे. प्रसूतीपूर्वी रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासण्यात आले. तेव्हा त्याचे प्रमाण अत्यंत कमी म्हणजे ५.६ ग्रॅम आढळले. हे प्रमाण कमीत कमी ११ ग्रॅम हवे. त्यामुळे प्रसूतीदरम्यान त्यांना गरज पडली, तर कोणता रक्तगट द्यावा लागेल, याची चाचणी करण्यात आली. तेव्हा त्यांचा रक्तगट बॉम्बे ब्लड ग्रुप असल्याचे निदान झाले; परंतु हे रक्त उपलब्ध नव्हते. हे आव्हान पेलत प्रसूतिशास्त्र विभागातील डॉक्टरांनी प्रसूती यशस्वी केली.
सुदैवाने नैसर्गिक प्रसूती झाली; परंतु प्रसूतीनंतर मनीषा यांची प्रकृती स्थिर होण्यासाठी त्यांना रक्त देणे गरजेचे आहे. त्यामुळे आता ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे रक्त शोधायचे कोठून? हा मोठा प्रश्न निर्माण झाला. सोशल मीडिया, मेसेजसह सर्व यंत्रणांच्या माध्यमातून या रक्तगटाचे रक्तदाता शोधण्याचे काम सुरू झाले. या मातेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यात विचारणा करण्यात आली. रक्तगटाची सहज उपलब्धता होत नव्हती. अखेरीस हा रक्तगट असलेल्या नाशिक, नांदेड आणि जालना येथील दात्यांनी पुढाकार घेतला. यात दात्याचे रक्त घेण्यासाठी नातेवाईक रविवारी सायंकाळी जालन्याला रवाना झाले. रात्रीतून या मातेला रक्त दिले जाईल. त्यामुळे मातेची प्रकृती धोक्यात जाण्यापासून टळणार आहे. काही दाते औरंगाबादेत येऊन रक्तदान करतील, असेही नियोजन करण्यात आले. प्रसूतीसाठी स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ. सोनाली देशपांडे, डॉ. अनुराग सोनवणे, डॉ. सुष्मिता पवार, डॉ. श्रेया आगलावे आदींनी प्रयत्न केले. रक्ताच्या उपलब्धेसाठी अनिल लुणिया यांनी प्रयत्न केले.
असा लागला या रक्तगटाचा शोध
मुंबईतील के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये १९५२ साली डॉ. वाय.म. भेंडे यांना असे आढळून आले की, एका रुग्णाचा रक्तगट हा चारही गटांशी जुळत नाही. तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या लोकांचे रक्त त्या रुग्णाच्या गटाशी जुळते की नाही ते पाहायला सुरुवात केली. अनेक लोकांचे नमुने तपासल्यानंतर शेवटी कुठे तो गट जुळला. ज्या रक्तदात्याच्या रक्तगट जुळला, तो होता मुंबईचा. म्हणजेच तेव्हाच्या बॉम्बेचा. म्हणून या वेगळ्या रक्तगटाला ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ नाव देण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.