कॉलेजनंतर वडिलांना चहाच्या ठेल्यावर मदत,रिकाम्या वेळेत अभ्यास करून सागर बनला ‘सीए’
By राम शिनगारे | Published: July 12, 2024 05:57 PM2024-07-12T17:57:37+5:302024-07-12T18:07:08+5:30
कॉलेज सुटल्यानंतर वडिलांना करायचा मदत; बारावीच्या परीक्षेत अकाउंट्समध्ये घेतले होते १०० गुण
छत्रपती संभाजीनगर : गुलमंडी परिसरातील नगारखाना गल्लीत छोट्याशा चहाच्या ठेल्यावर ग्राहकांना चहा देत फावल्या वेळेत अभ्यास करून सागर संतोष मेघावाले हा तरुण सीए परीक्षा उत्तीर्ण झाला. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे मे २०२४ मध्ये घेतलेल्या सनदी लेखापाल (सीए) परीक्षेचा अंतिम निकाल गुरुवारी जाहीर झाला अन् मेघावाले परिवाराला सागराएवढा आनंद झाला.
सागर हा स.भु. कला व वाणिज्य महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. सागरच्या वडिलांचा चहाचा ठेला आहे. पैठणगेट परिसरात राहत असल्यामुळे तेथून हा ठेला जवळच होता. सागर व लहान भाऊ दोघे वेळ मिळेल तशी आई-वडिलांना मदत करीत होते. या ठेल्यावरच त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालतो.
सागर दहावीची परीक्षा आ.कृ. वाघमारे शाळेतून उत्तीर्ण झाला. त्यानंतर स.भु. महाविद्यालयातील वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. बारावीच्या परीक्षेत अकाउंटमध्ये १०० पैकी १०० गुण त्याने घेतले. पदवीचे शिक्षण सुरू असतानाच त्याने सीए परीक्षेची तयारी सुरू केली. त्याने सीपीटी परीक्षेत १४५ गुण घेतले. आयपीसीसी परीक्षेच्या पहिल्या गटात २३५ आणि दुसऱ्या गटात १५० गुण मिळवले. सीएच्या अंतिम परीक्षेत पहिल्या गटात १५८ आणि दुसऱ्या गटात २०५ गुण मिळवीत परीक्षा उत्तीर्ण झाला. या यशाने आई-वडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता.
२० वर्षांच्या मेहनतीचे सार्थक झाले
चहाचा ठेला चालवून मुलांचे शिक्षण व कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. मुलगा सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे २० वर्षांच्या मेहनतीचे सार्थक झाले. आमच्या कुटुंबातील सागर हा पहिलाच सीए आहे. त्याचा मला अभिमान वाटतो.
- संतोष मेघावाले, सागरचे वडील
दोन वर्षे नोकरी करणार
आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आता दोन वर्षे नोकरी करणार आहे. त्यानंतर स्वत:चा व्यवसाय उभारणार आहे. सीएची परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे एक स्वप्न पूर्ण झाले. लहान भाऊ पोलिस भरतीची तयारी करीत आहे. त्याच्या शिक्षणाकडेही लक्ष देणार आहे.
- सागर मेघावाले, सीए परीक्षा उत्तीर्ण