कौतुकास्पद ! महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेले उपग्रह आकाशात झेपावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 12:25 PM2021-02-08T12:25:08+5:302021-02-08T12:26:47+5:30
प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका शाळांमधील दहा विद्यार्थ्यांची जागतिक विक्रमाच्या माेहिमेसाठी जानेवारी महिन्यात निवड झाली होती.
औरंगाबाद : भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनद्वारा आयोजित स्पेस रिसर्च पेलोड क्यूब चॅलेंज-२०२१ साठी औरंगाबाद महापालिका शाळेच्या दहा विद्यार्थ्यांनी बनवलेले उपग्रह रविवारी अवकाशात झेपावले. देशातील शंभर विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे उपग्रह रामेश्वर येथून बलूनद्वारे आकाशात सोडण्यात आले.
प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका शाळांमधील दहा विद्यार्थ्यांची जागतिक विक्रमाच्या माेहिमेसाठी जानेवारी महिन्यात निवड झाली होती. सोनाली यादव, सूरज जाधव, विशाल वाहुळ, गुलनाज सय्यद, राणी चोपडे, नंदिनी मोटे, प्रतिमा म्हस्के, साहिल केदारे, इरशाद खान व रूपाली गायकवाड या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन प्रशिक्षण काही दिवसांपासून सुरू होते. पुणे येथील प्रशिक्षण केंद्रातही त्यांना प्रशिक्षण देऊन उपग्रह बनविण्यात आला. डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल फाउंडेशनच्या स्पेस रिसर्च या फाउंडेशनचे समन्वयक मिलिंद चौधरी आणि मनिषा चौधरी यांनी या उपक्रमाचे नियोजन केले होते.
रविवारी रामेश्वरम् येथून उपग्रह आकाशात सोडवतानाचे थेट प्रक्षेपण पाहताना इंदिरानगरच्या शाळेत प्रकल्प समन्वयक शशिकांत उबाळे, सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार, रश्मी होंमुटे, सुरेखा महाजन यांची उपस्थिती होती. या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, भारतीय बुक रेकॉर्ड, एशियन बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, असिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड्स हे पाच प्रमाणपत्र कुरिअरद्वारे मिळणार असल्याची माहिती संजीव सोनार यांनी दिली.
सर्वात कमी वजनाचे उपग्रह
जगात सर्वात कमीत कमी २५ ग्रॅम वजनाचे ते जास्तीत जास्त ८० ग्रॅम वजनाचे १०० उपग्रह बनवून त्यांना ३५ ते ३८ हजार मीटर उंचीवर सायंटिफिक बलूनद्वारे प्रक्षेपित करणारा हा उपक्रम होता. हे उपग्रह आकाशात सोडल्यानंतर तिथून प्रत्यक्ष वातावरणाची माहिती पाठवणार आहेत. त्यामुळे या उपक्रमात औरंगाबाद पालिका विद्यार्थ्यांचाही सहभाग असणे, ही बाब गौरवास्पद आहे.