कौतुकास्पद ! पैठण तालुक्यातील तीन मोसंबी रोपवाटीकांना मिळणार राष्ट्रीयस्तरावर मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 07:25 PM2020-12-09T19:25:57+5:302020-12-09T19:30:10+5:30
राष्ट्रीय पातळीवर मान्यता देण्याईतकी सदर फळरोपवाटीकांंनी गुणवत्ता जोपासली
पैठण : पैठण तालुक्यात कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या मोसंबीच्या तीन फळरोपवाटीकांना लवकरच राष्ट्रीयस्तरावरील मान्यता मिळणार असून मंगळवारी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ गुडगाव येथील पथकाने पैठण तालुक्यातील फळ रोपवाटिकेस भेट देऊन पाहणी केली आहे. राष्ट्रीय पातळीवर मान्यता देण्याईतकी सदर फळरोपवाटीकांंनी गुणवत्ता जोपासली असल्याचे मत पथकातील डॉ. एस. के. दुबे यांनी व्यक्त केले आहे.
पैठण तालुक्यात शेतकऱ्यांनी ४० रोपवाटिका तयार केल्या आहेत. यातील रजापूर , बालानगर व पाचोड येथील शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या फळरोपवाटिकेतून दिलेल्या मोसंबी फळांच्या कलमांंना शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सदर रोपवाटिकांंना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळावी म्हणून तालुका कृषी अधिकारी संजय सिरसाट यांनी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ गुडगावकडे प्रस्ताव सादर केले होते. राष्ट्रीय पातळीवर फळरोपवाटीकांचे निकष पूर्ण करत असल्याने फळ रोपवाटीकेंची मंगळवारी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचे डॉ. एस.के.दुबे, डॉ. सलीम मिर यांनी पाहणी केली. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ किशोर झाडे , तालुका कृषि अधिकारी संदीप शिरसाठ , कृषि पर्यवेक्षक मिर्झा आदी उपस्थित होते .
फलोत्पादनाकडे निश्चित व श्वाश्वत उत्पादन देणारे क्षेत्र म्हणून शेतकरी पाहतात. विविध फळ पिकांना असलेले पोषक हवामान विचारात घेता, ज्या फळपिकांना ज्या विभागात वाव आहे त्या विभागात त्या फळपिकांच्या रोपवाटीका स्थापना करण्यात आल्या आहेत. राज्यात सन १९९०-९१ पासून रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड कार्यक्रम सुरू झाल्यानंतर या कार्यक्रमासाठी आवश्यक कलमा व रोपाची उपलब्धता राज्यातील शासकीय, कृषी विद्यापीठ व पंजीकृत खाजगी रोपवाटीकांवरून करण्यात येत आहे. पैठण तालुक्यात मोसंबीच्या फळरोपवाटीका तयार करण्यात आल्या आहेत असे तालुका कृषी अधिकारी संदीप सिरसाट यांनी सांगितले.