भौतिक सुविधा नसलेल्या आणखी ५ काॅलेजमध्ये प्रवेश बंदी, ४ काॅलेजला २ लाखांचा दंड
By योगेश पायघन | Published: August 22, 2022 07:25 PM2022-08-22T19:25:05+5:302022-08-22T19:27:02+5:30
आतापर्यंत १७ महाविद्यालयांवर कारवाई - उर्वरीत ५ महाविद्यालयांची सुनावणी लवकरच
औरंगाबाद - भाैतिक सुविधा नसलेल्या १२ महाविद्यालयांवर कारवाई झाली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६४ व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला आणखी पाच महाविद्यालयांतील सुविधा नसलेल्या अभ्यासक्रमांना 'नो ॲडमीशन झोन'मध्ये टाकले. तर चार महाविद्यालयांना प्रत्येकी २ लाखांचा दंडात्मक कारवाईचा बडगा कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी उगारला. यातून गुणवत्ता आणि सुविधांमध्ये तडजोड मान्य करणार नसल्याचा इशारा महाविद्यालयांना दिला.
पाच महाविद्यालयांची सुनावणी १२ ऑगस्ट रोजी झाली होती. त्यात घेतलेल्या निर्णयाचे आदेश सोमवारी कुलगुरू डाॅ. येवले यांनी दिले. शेंद्रा येथील पिपल्स फॉरेन्सिक सायन्स अँड सायबर सेक्युरेटी काॅलेजमधील बीएस्सी फॉरेन्सिक सायन्स अँड सायबर सेक्युरिटी एक तुकडी, बीएस्सी नॉन कन्व्हेशनल अँड कन्व्हेशनल एनर्जी एक तुकडी, एमएस्सी अप्लाइड फिजिक्स अँड बॅलेस्टिक्स एक तुकडी, एमएस्सी फॉरेन्सिक अँड टॉक्सिकालॉजी एक तुकडी या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे नवीन प्रवेश बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. शरणापूर फाटा, टी-पॉइंट येथील डीएसआर अध्यापक महाविद्यालयामध्ये सुरू असलेल्या बीएड अभ्यासक्रमाची एक तुकडी, एमएड पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे एक तुकडीचे नवीन प्रवेश बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. कन्नड तालुक्यात हतनूर येथील राष्ट्रिय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील एमए राज्यशास्त्र, एमए इतिहास या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विनाअनुदानित तत्वावरील प्रत्येकी एका तुकडीचे नवीन प्रवेश बंद करण्यात आले.
तसेच पैठण येथील मॅजिक कम्प्युटर अकॅडमी महाविद्यालयात सुरू असलेल्या डीसीए अभ्यासक्रमाची एक तुकडी, बीसीएम एक तुकडी, बीएससी संगणकशास्त्र एक तुकडी, एमसीएम एक तुकडी या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे नवीन प्रवेश बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. या चार महाविद्यालयास प्रत्येकी दोन लाख रुपयांचा दंड १५ दिवसांत भरा अन्यथा ७ टक्के व्याज आकरण्याचे आदेश कुलगुरूंनी दिली. तर बीड येथील मिलीया महाविद्यालयातील एमएस्सी संगणकशास्त्र एक तुकडी, एमए इंग्रजी एक तुकडी या अभ्यासक्रमाचे नवीन प्रवेश बंद करण्यातचे निर्देशित करण्यात आले.
कारवाईचा दिसतोय सकारात्मक परिणाम
तपासणीच्या प्रक्रियेत असलेल्या उर्वरीत पाच महाविद्यालयांची सुनावणी लवकरच होईल. हि निरंतर प्रक्रीया असून पुढील टप्प्यातील महाविद्यालयांची तपासणी लवकरच सुरू होईल. या कारवाईमुळे महाविद्यालये सुविधा नसतील तर स्वत:हून बंद करत आहेत. तसेच अध्यापकांची भरती करत असल्याचा सकारात्मक प्रयत्न दिसून येत आहे.
-डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू, डाॅ. बाबासाहेब आंंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद