भौतिक सुविधा, अध्यापक नसलेल्या ५ महाविद्यालयांना प्रवेशबंदी, २ लाख दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 12:30 PM2022-07-26T12:30:24+5:302022-07-26T12:33:35+5:30
कुलगुरूंचा निर्णय : संलग्नीकरण देणाऱ्या समित्यांचीही होणार चौकशी
औरंगाबाद : चिश्तिया कला महाविद्यालय, खुलताबाद, राजकुंवर महाविद्यालय, धावडा आणि फर्दापूर, कै. श्रीनिवासरावजी दगडूजी देशमुख संगणक व व्यवस्थापन महाविद्यालय, भोकरदन, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बदनापूर या पाच महाविद्यालयांनी प्रत्येकी दोन लाख रुपयांचा दंड येत्या पंधरा दिवसांत भरण्याचे आदेश कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी सोमवारी दिले, तसेच या महाविद्यालयातील भौतिक सुविधा व आवश्यक अध्यापक नसलेल्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना नवीन प्रवेशास बंदी करण्यात आली आहे.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापाठीने ठरवून दिलेले नियम, निकषांचे उल्लंघन करणाऱ्या १० महाविद्यालयांतील सोयी-सुविधांची पडताळणी केली. त्यानंतर व्हिडीओ चित्रफितीसह सत्यशोधन अहवाल समित्यांनी कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांच्याकडे सादर केला. त्यावर गुरुवारी (दि. २१) ५ महाविद्यालयांची बाजू कुलगुरूंनी ऐकून घेतली, तर ५ महाविद्यालयांची सुनावणी अद्याप बाकी आहे. सोयी-सुविधा न देणे, आवश्यक अध्यापकांची नेमणूक न करणे, शासन आदेशाचे उल्लंघन करणे, पायाभूत सुविधा नसल्याने पाच महाविद्यालयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचा दंड आकारून काही अभ्यासक्रमांचे यावर्षी प्रवेश बंद करण्याचे आदेश दिले. पुढील सहा महिन्यांत बंद केलेल्या अभ्यासक्रमासंबंधी त्रुटीपूर्तता करून अनुपालन अहवाल सादर करावा. त्यानंतर ते अभ्यासक्रम सुरू ठेवण्याबाबत निर्णय तज्ज्ञ समितीच्या तपासणीनंतर विद्या परिषदेद्वारे घेतला जाईल, असे कुलगुरूंनी आदेशात म्हटले आहे.
या महाविद्यालयांवरही झाली कारवाई
कला वाणिज्य महाविद्यालय, बदनापूर, श्रीनिवासरावजी दगडूजी देशमुख संगणक व व्यवस्थापन महाविद्यालय, भोकरदन, चिश्तिया कला महाविद्यालय, खुलताबाद, राजकुंवर महाविद्यालय, धावडा आणि (धनवट) फर्दापूर या पाच महाविद्यालयांवर अनियमिततेचा ठपका ठेवत विद्यापीठाने कारवाई केली आहे. यापैकी काही महाविद्यालयांत अभ्यासक्रमनिहाय अध्यापकांची नियुक्ती नाही, पदव्युत्तर अभ्यासक्रमाची क्षमता ६० वरून ३० करण्यात आली, विनाअनुदानित तत्त्वावरील पदवी व पदव्युत्तरच्या तुकड्यांचे प्रवेश थांबवण्यात आले, नॅक मूल्यांकन नाही.