‘अ‍ॅडमिशन फुल’; महापालिकेच्या 'या' शाळेत प्रवेश घेण्यासाठी लागतात चक्क रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 06:43 PM2019-12-23T18:43:52+5:302019-12-23T18:54:34+5:30

सर्वसाधारणपणे खाजगी इंग्रजी शाळांच्या बाबतीत दिसणारे चित्र १९७० ची स्थापना असलेल्या औरंगाबाद महानगरपालिकेच्या नारेगाव येथील शाळेत दिसते

'Admission Full'; It takes a long time to enter the municipal school in Aurangabad | ‘अ‍ॅडमिशन फुल’; महापालिकेच्या 'या' शाळेत प्रवेश घेण्यासाठी लागतात चक्क रांगा

‘अ‍ॅडमिशन फुल’; महापालिकेच्या 'या' शाळेत प्रवेश घेण्यासाठी लागतात चक्क रांगा

googlenewsNext
ठळक मुद्दे शाळेतील मुलांची एकूण संख्या २५२५ असून, यापैकी १३२६ मुले आणि ११९९ मुली आहेत.शाळेतील बहुतांश मुले कष्टकरी वर्गातील आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वावविज्ञान प्रदर्शन दरवर्षी 

- रुचिका पालोदकर

औरंगाबाद : शाळेत प्रवेश मिळावा म्हणून पालकांच्या लागलेल्या रांगा आणि काही दिवसांतच ‘अ‍ॅडमिशन फुल’, ‘प्रवेश बंद’ अशा शाळेच्या प्रवेशद्वारावर झळकणाऱ्या पाट्या, हे सर्वसाधारणपणे खाजगी इंग्रजी शाळांच्या बाबतीत दिसणारे चित्र १९७० ची स्थापना असलेल्या औरंगाबाद महानगरपालिकेच्या नारेगाव येथील शाळेत दिसू लागते, तेव्हा साहजिकच पाहणाऱ्यांचे डोळे विस्फारतात. एकीकडे मनपाच्या इतर शाळा ओस पडत असताना या शाळेत दिसणारे चित्र मात्र साहजिकच सुखावणारे ठरते. 

नारेगावच्या महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात इयत्ता १ ली ते १० वी असे वर्ग चालतात. शाळेतील मुलांची एकूण संख्या २५२५ असून, यापैकी १३२६ मुले आणि ११९९ मुली आहेत. शाळेतील बहुतांश मुले कष्टकरी वर्गातील आहेत. ही मुले इतर मुलांच्या स्पर्धेत कुठेही कमी पडू नयेत, यासाठी शिक्षकांकडून कसोशीने प्रयत्न केले जातात. यामुळेच सातत्याने दहावी बोर्डात शाळेच्या विद्यार्थ्यांचा निकाल उत्तम लागत असून, यामुळे दरवर्षी शाळेच्या विद्यार्थिसंख्येतही वाढ होते.

मुख्याध्यापक अंकुश लाडके म्हणाले की, शाळेत बहुसंख्य मुले अशी आहेत, जी बाहेर शिकवणी लावू शकत नाहीत. त्यामुळे शिक्षकांनाच विद्यार्थ्यांकडे जास्त लक्ष द्यावे लागते. यासाठी आम्ही एक विशिष्ट पद्धत बनवली असून, याअंतर्गत एका शिक्षकाकडे १२ विद्यार्थी याप्रमाणे दहावीच्या मुलांची विभागणी केली आहे. हे शिक्षक आपल्या गटातील विद्यार्थ्यांचा अभ्यास, दर आठवड्याला त्यांची होणारी प्रगती याचा बरोबर आढावा घेतात. काही पालक मुलांना शाळेत नियमितपणे पाठवीत नाहीत. अशा पालकांना शाळेत बोलावून शिक्षक त्यांना समजावून सांगतात आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून देतात. 

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव
नारेगाव शाळेतील मुले केवळ अभ्यासातच हुशार आहेत, असे नाही, तर या शाळेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल, याकडे लक्ष दिले जाते. शहरात किंवा शहराबाहेर होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांना आवर्जून पाठविले जाते. त्यामुळे वक्तृत्व असो किंवा नृत्य, चित्रकला विद्यार्थ्यांना प्रत्येक स्पर्धेच्या दृष्टीने तयारी करावी लागते. याशिवाय शाळेत संगणक खोली आणि अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा असून, प्रत्येकाला विद्यार्थ्याला संगणक शिकविले जाते.

विज्ञान प्रदर्शन दरवर्षी 
नारेगाव माध्यमिक विद्यालयाचा असा नियम आहे, की शाळेचा दैनंदिन परिपाठ झाल्यावर एका वर्गाने एक विज्ञान प्रयोग सादर करायचा. यामुळे वर्षभर मुले या उपक्रमांतर्गत आपल्याला काय नवीन देता येईल याचा विचार करतात. त्यानंतर या प्रयोगांपैकी काही उत्तम प्रयोगांची निवड केली जाते आणि डिसेंबर-जानेवारी या काळात दरवर्षी एक विज्ञान प्रदर्शन आयोजित केले जाते. या प्रदर्शनात विद्यार्थी विज्ञान प्रयोग सादर करतात. यासाठी बाहेरच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाही प्रयोग पाहण्यासाठी आमंत्रित केले जाते.

शाळेची इमारत आम्हाला पुरत नाही 
दोन वर्षांपासून आम्ही नववी आणि दहावीचे बाहेरून होणारे प्रवेश पूर्णपणे बंद केले आहेत. कारण आमचेच विद्यार्थी खूप आहेत. शाळेची इमारत अतिशय मोठी असूनही ती आम्हाला पुरत नाही. त्यामुळे आम्ही गावातील दुसरी जागादेखील घेतली असून, त्याठिकाणीही वर्ग भरवतो. शिक्षकांची मेहनत आणि विद्यार्थ्यांची साथ यामुळे शाळेचा निकाल दरवर्षी उत्तम लागतो. यावर्षीही दहावीत आमचा विद्यार्थी ९५ टक्के नक्की घेणार, असा आम्हाला विश्वास आहे. - अंकुश लाडके, मुख्याध्यापक 

Web Title: 'Admission Full'; It takes a long time to enter the municipal school in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.