विद्यापीठाशी संलग्न फक्त १५ महाविद्यालयांतील प्रवेश संख्या 'जैसे थे'
By राम शिनगारे | Published: June 14, 2023 08:12 PM2023-06-14T20:12:53+5:302023-06-14T20:13:32+5:30
महाविद्यालयांचे ऑडीट; ३९४ पैकी २७० महाविद्यालयांनी त्रुटीची पूर्तता केल्याचा दावा
छत्रपती संभाजीनगर : विद्यापीठाने ३९४ महाविद्यालयांचे ॲकडमीक ऑडिट केले आहे. त्या ऑडिटमध्ये दाखविलेल्या त्रुटींची पुर्तता केल्याचा दावा २७० महाविद्यालयांनी विद्यापीठ प्रशासनाकडे केला. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने संबंधित महाविद्यालयांनी केलेल्या दाव्यांची पडताळणी केली असता, त्यातील केवळ १५ महाविद्यालयांनीच त्रुटींची पूर्तता केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे केवळ या १५ महाविद्यालयांतील जागांची संख्याच 'जैसे थे' होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न ३९४ महाविद्यालयांचे ॲकडमीत ऑडिट करण्यात आले आहे. त्यात १३० महाविद्यालयांना कोणताही ग्रेड मिळालेला नव्हता. ९८ महाविद्यालयांना 'डी' ग्रेड प्राप्त झाला तर 'ए' ग्रेडमध्ये ६१, 'बी'मध्ये ४८ आणि 'सी'ग्रेडमध्ये ५७ महाविद्यालयांचा समावेश होता. ॲकडमीत ऑडिट करताना विद्यापीठ प्रशासनाने संबंधितांना महाविद्यालयांमध्ये पायाभुत सुविधांमध्ये असलेल्या त्रुटी दाखवून दिल्या होत्या. तसेच या त्रुटी दुर करण्यासाठी काही कालावधीही देण्यात आला होता. विद्यापीठ प्रशासनाकडे ३९४ पैकी २७० महाविद्यालयांनी त्रुटी दुर केल्याचा दावा केला आहे. त्यातील २२५ पेक्षा अधिक महाविद्यालयांची पडताळणी विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाने केली आहे. त्यात केवळ १५ महाविद्यालयांनी त्रुटीची पुर्तता केली असल्याचे समोर आले. त्यामुळे त्रुटीची पुर्तता केलेल्या महाविद्यालयांमधीलच विद्यार्थी संख्येच्या जागा पूर्ववत केल्या जातील. उर्वरित महाविद्यालयांना ही संधी दिली जाणार नाही. त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई कायम ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
या महाविद्यालयांना संबंधित ऑडिटवर आक्षेप घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यात २७० महाविद्यालयांनी आक्षेप नोंदवले. त्या महाविद्यालयांच्या पायाभुत सुविधांचा पुन्हा पडताळणी केली असता केवळ १५ महाविद्यालयांनाच दिलासा मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.