पदवीत नापास विद्यार्थ्यांना दिले पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 07:57 PM2018-06-29T19:57:12+5:302018-06-29T19:58:08+5:30
पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थीच मिळत नसल्याने पदवी परीक्षेत नापास विद्यार्थ्यांनाही पदव्युत्तर विभागात प्रवेश देण्याची किमया डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने केली.
औरंगाबाद : पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थीच मिळत नसल्याने पदवी परीक्षेत नापास विद्यार्थ्यांनाही पदव्युत्तर विभागात प्रवेश देण्याची किमया डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने केली. नापासांना दिलेले हे प्रवेश कोणत्या नियमाखाली देण्यात आले, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीच्या सुमारे ५ हजार ८३७ जागा रिक्त राहिल्या आहेत. प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीसाठी विद्यापीठातर्फे २५ जून रोजी मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत २८ जून रोजी संपली. या तीन दिवसांच्या कालावधीत प्रवेशाची संख्या ३,१२४ वरून ३९९६ वर पोहोचली. चिंताग्रस्त प्रशासनाने गुरुवारी प्रवेशाची पुढील दिशा ठरविण्यासाठी विभागप्रमुखांची बैठक बोलावली. या बैठकीत विभागप्रमुखांनी प्रशासनाला धारेवर धरत नापास विद्यार्थ्यांना पदव्युत्तर प्रवेश कसा दिला जातो, याचा जाब विचारला. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, सीईटी समन्वयक डॉ. वाल्मीक सरवदे आदी उपस्थित होते. या बैठकीत रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सुरेश गायकवाड यांनी नापासांना पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश कोणत्या आधारावर देण्यात येत आहे, असा प्रश्न उपस्थित केला. यावर परीक्षेचे समन्वयक डॉ. वाल्मीक सरवदे यांनी सांगितले की, प्रकुलगुरूंच्या आदेशाने पत्रक काढण्यात आले आहे. यावर प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर म्हणाले की, ज्या दिवशी पत्र निघाले त्या दिवशी मी सुटीवर होतो. पत्र काढण्याचा आदेश मी दिलेला नाही.
अनेक विभागांची अवस्था बिकट
कोणत्याही प्रकारचा गोंधळ, गडबड न होता संपूर्ण सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) पार पडली. मात्र ज्या हेतूसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. त्याचा उद्देशच सफल झाला नाही. विद्यापीठातील रसायनशास्त्रासारख्या नामांकित विभागात ही प्रक्रिया संपल्यानंतर दोन अभ्यासक्रमांच्या १९ जागा रिक्त राहिल्या आहेत. इतर विभागांची अवस्था तर त्याहून अधिक वाईट आहे. अनेक विभागांच्या ५० टक्केही जागा भरल्या नाहीत.
३ जुलैला स्पॉट अॅडमिशन
सलग दुसऱ्या वर्षी सीईटीच्या फसलेल्या प्रयोगानंतर विद्यापीठ प्रशासनाने रिक्त जागांवर प्रवेशासाठी ३ जुलै रोजी स्पॉट अॅडमिशन देण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीचे सर्वाधिकार विभागप्रमुखांना दिले आहेत. मात्र या प्रवेश प्रक्रियेत सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांनाच सहभागी होता येणार आहे. यानंतरही रिक्त जागा राहिल्यास विना सीईटी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याचे प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी स्पष्ट केले.
पाच जाणांची समिती
विद्यापीठासह महाविद्यालयातील पदव्युत्तरच्या रिक्त जागांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी पाच सदस्यांची समिती स्थापन केली आहे. यात समन्वयक डॉ. वाल्मीक सरवदे, कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड, डॉ. धनश्री महाजन, डॉ. एम. डी. शिरसाठ आदींचा समावेश आहे.