यंदापासून आयटीआय झालेल्यांना पॉलिटेक्निकच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश; प्रक्रिया झाली सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 01:39 PM2022-06-20T13:39:03+5:302022-06-20T13:42:37+5:30

औरंगाबाद विभागात ५७ पॉलिटेक्निक कॉलेजेस असून १५,०४० एवढी प्रवेश क्षमता आहे

Admission to the second year of Polytechnic for ITI graduates from this year; The process started | यंदापासून आयटीआय झालेल्यांना पॉलिटेक्निकच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश; प्रक्रिया झाली सुरू

यंदापासून आयटीआय झालेल्यांना पॉलिटेक्निकच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश; प्रक्रिया झाली सुरू

googlenewsNext

औरंगाबाद : पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांना ई-स्क्रुटनिंग आणि प्रत्यक्ष स्क्रुटनिंग या दोन्हींपैकी एका सुविधेचा पर्याय निवडून अर्ज भरता येणार आहे.

औरंगाबाद विभागात शहरी व ग्रामीण भागात ५० प्रवेश सुविधा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्याठिकाणी विद्यार्थ्याला प्रवेशासंबंधीचे मार्गदर्शन तसेच नोंदणी अर्ज भरण्याची मोफत सुविधा करण्यात आली आहे.औरंगाबाद विभागात शासकीय व अशासकीय असे एकूण ५७ पॉलिटेक्निक कॉलेजेस असून त्यांची १५,०४० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. तंत्रनिकेतन अर्थात अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारा विद्यार्थी हा प्रामुख्याने ग्रामीण भागातील तसेच मराठी माध्यमात शिकलेला असल्यामुळे अशा विद्यार्थ्यांना परीक्षा व अध्ययन-अध्यापनासाठी मराठी माध्यमाचाही पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

विशेष म्हणजे, यंदापासून कोणत्याही शाखेतून आयटीआय उत्तीर्ण झालेला विद्यार्थी हा तंत्रनिकेतनच्या थेट द्वितीय वर्षाच्या कोणत्याही शाखेत प्रवेशासाठी पात्र राहील, असा शासनाने नियम केला आहे. विद्यार्थ्यांच्या सोईसाठी तिसऱ्या अतिरिक्त प्रवेश फेरीचा अंतर्भाव या वर्षापासून प्रवेशप्रक्रियेत करण्यात आला आहे. कोव्हिडमुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपले आई व वडील गमावले आहेत व ज्यांच्याकडे ‘पीएम केअर्स प्रमाणपत्र’ आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी दोन अतिरिक्त जागा अभ्यासक्रमनिहाय राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.

प्रवेशासाठी लागणाऱ्या विविध कागदपत्रांची पूर्तता होण्याच्या दृष्टीने तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रवेशासाठी आवश्यक ती कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली आहे. पालक व विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेच्या उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक उमेश नागदेवे यांनी केले आहे.

Web Title: Admission to the second year of Polytechnic for ITI graduates from this year; The process started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.