"सीआयएसएफ"च्या जवानांचा हरित संकल्प , "झाल्टा" गाव घेतले दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 11:17 AM2017-07-21T11:17:23+5:302017-07-21T11:19:33+5:30
शहराजवळील झाल्टा गाव दत्तक घेऊन स्वछता अभियान आणि वृक्षारोपण उपक्रमांतून गाव स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्याचा ध्यास "सीआयएसएफ"च्या जवानांनी घेतला आहे.
ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कडेकोट बंदोबस्तासाठी डोळ्यात तेल घालून दिवस-रात्र पहारा देणारे ‘केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला’चे (सीआयएसएफ) जवान सामाजिक जबाबदारी जोपासत आहेत. शहराजवळील झाल्टा गाव दत्तक घेऊन स्वछता अभियान आणि वृक्षारोपण उपक्रमांतून गाव स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्याचा ध्यास "सीआयएसएफ"च्या जवानांनी घेतला आहे.
दोन वर्षांपूर्वी "सीआयएसएफ"ने हे गाव दत्तक घेतले आहे. स्वछता अभियानासह गावात व्यसनमुक्तीपर कार्यक्रम घेण्यावर भर दिला जात आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे निसर्गाचा लहरीपणा वाढत असल्याने पर्यावरणचे रक्षण ही सर्वांची जवाबदारी आहे. पुढील पिढीला शुद्ध हवा मिळावी व दुष्काळ परिस्थीती निर्माण होऊ नये म्हणून निसर्गाचे संवर्धन करणे ही गरज आहे. हीच बाब लक्षात घेऊन "सीआयएसएफ"तर्फे या गावात ९०० रोपे लावण्याचा उपक्रम घेण्यात आला. झाल्टा ,सुंदरवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच संजय शिंदे , रवींद्र शिंदे, अजय सुरासे, "सीआयएसएफ"चे निरीक्षक अरुण मिश्रा, मनोज कुमार, सिराज खान, उपनिरीक्षक ए.के.यादव, ई.के.पाटील, डी.एम. आमले, डी.पी.गुप्ता,जी.डी.यादव, एस.वाय.एफ.अहेमद, शेख अहेमद यांच्यासह जवान, ग्रामस्थांच्या हस्ते वृक्षारोपण करून शुक्रवारी(दि.२१)या उपक्रमाची सुरूवात झाली."सीआयएसएफ"चे उप कमांडट आलोककुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
प्रारंभी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात रोपांची लागवड करण्यात आली. यात विद्यार्थ्यांनीदेखील उस्फुर्त सहभाग नोंदविला. लावलेल्या रोपाची स्वतः काळजी घेणार, असा विश्वासही विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. गावातील ज्येष्ठ नागरिकही मागे नव्हते. त्यांनीही यात उस्फूर्तपणे सहभागी होत गाव हरित होण्यासाठी रोपे लावली. गावातील पाण्याची टाकी, मंदिर परिसरातही रोपे लावण्यात आली. दैनंदिन कामकाज सांभाळत सामाजिक उपक्रमात सहभागी झाल्याचा आनंद प्रत्येक जवानांच्या चेह-या वर झळकत होता.