सचिन तेंडुलकरने उस्मानाबादमधील गाव घेतलं दत्तक
By Admin | Published: August 18, 2016 12:44 AM2016-08-18T00:44:17+5:302016-08-18T12:38:54+5:30
खासदार सचिन तेंडुलकरने सासंद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत उस्मानाबादमधील डोंजा गाव घेतलं आहे, त्यामुळे डोंजा ग्रामस्थांच्या आशा उंचावल्या आहेत.
परंडा, दि. 18 - साधारणपणे पाच हजार लोकसंख्या असलेल्या डोंजा या गावाचे येणाऱ्या काळात रूपडे बदलणार आहे. त्याला कारणही तसेच आहे. एकेकाळी आपल्या धडाकेबाज खेळीने क्रिकेटचे मैदान गाजविलेल्या खासदार सचिन तेंडुलकरने सासंद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत हे गाव दत्तक घेतले आहे. त्यामुळे डोंजा ग्रामस्थांच्या आशा उंचावल्या आहेत.
केंद्र शासनाच्या वतीने सांसद आदर्श ग्राम योजना सुरू करण्यात आली आहे. सदरील योजनेअंतर्गत खासदारांनी एकेक गाव दत्तक घेवून संबंधित गावाचा चौफेर विकास करणे अपेक्षित आहे. सदरील योजनेअंर्तत क्रिकेटचा देव आणि सध्या खासदार असलेल्या सचिन तेंडुलकर यांनी यापूर्वी म्हणजेच पहिल्या टप्प्यात आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील गाव दत्तक घेतले होते. आंध्र प्रदेशातील गाव दत्तक घेतल्याने अनेकांनी टीका करून महाराष्ट्रातील गाव दत्तक घेण्याबाबत सूचित केले होते.
त्यानुसार साधारणपणे दोन ते सव्वादोन महिन्यांपूर्वी क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले, सामाजिक कार्यकर्ते अविनाश फाळके, प्रा. मिलिंद बागल यांनी डोंजा या गावामध्ये येऊन पाहणी केली होती. येथील ग्रामस्थांना भेडसाविणाऱ्या प्रश्नांचा त्यांनी आढावा घेतला होता. सदरील अहवाल सादर झाल्यानंतर सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत विकासापासून कोसोदूर असलेले हे डोंजा गाव दत्तक घेत असल्याबाबत पंचायत राज समितीच्या सचिवांना कळविले आहे. दरम्यान, खा. सचिन तेंडुलकर यांनी डोंजा गाव दत्तक घेतल्याचे जाहीर केल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार गावाचा विकास आराखडा संबंधित अधिकाऱ्यांकडून तयार करून घेण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात गावाचा कार्यापालट होणार आहे.
गावासाठी राबविण्यात आलेली पाणीपुरवठा योजना खूप जुनी झाली आहे. ग्रामस्थांनी सांगितल्यानुसार ही योजना राबवून किमान पन्नास वर्षांचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे सातत्याने तांत्रिक अडचणी उद्भवतात. गावाला मुबलक पाणी मिळावे, यासाठी नवीन जलवाहिनी टाकण्यासोबतच पाणी साठविण्यासाठी आवश्यकतेनुसार टाकीही उभारावी लागणार आहे.
४गावातील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्नही अत्यंत गंभीर आहे. पावसाळ्यामध्ये ग्रामस्थांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते.
त्यामुळे गावामध्ये सिमेंट रस्त्याची कामे युद्धपातळीवर होणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे गावामध्ये सार्वजनिक शौचालयांचीही आवश्यकता आहे. महिला, पुरूषांसाठी सार्वजनिक शौचालये उभारल्यास गाव हागणदारीमुक्त होण्यास मदत होईल.
४रेणुका देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्थाही फारशी चांगली नाही. विशेष म्हणजे याच रस्त्यावर भाविकांसह ग्रामस्थांचीही सातत्याने वर्दळ असते. त्यामुळे सदरील रस्त्याचे डांबरीकरण करणेही तितकेचे गरजेचे आहे. गावातील वृक्षांची संख्या लक्षात घेता येणाऱ्या काळात वृक्षलागवडीवर अधिकाअधिक भर देणेही आवश्यक आहे.
खासदार सचिन तेंडूलकर यांनी डोंजा हे गाव दत्तक घेतल्यामुळे विकासपासून कोसोदूर असणाऱ्या या गावाचे आता रूपडे बदलणार आहे. ग्रामस्थांना भेडसाविणाऱ्या प्रश्नांची या निमित्ताने सोडवणूक तर होईलच. परंतु, इतर आवश्यक सोयीसुविधांमध्येही भर पडले, असा विश्वास डोंजा ग्रामपंचायतीच्या सरपंच संध्या सूर्यवंशी यांनी सांगितले.