अ‍ॅडव्हॉन्टेज महाराष्ट्र एक्स्पोत उपयुक्तता, कल्पकतेचा संगम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 07:55 PM2020-01-10T19:55:30+5:302020-01-10T19:58:20+5:30

मराठवाड्याची औद्योगिक क्षमता दर्शविणारे प्रदर्शन

Advantage Maharashtra Expo a combination of ingenuity and Utility | अ‍ॅडव्हॉन्टेज महाराष्ट्र एक्स्पोत उपयुक्तता, कल्पकतेचा संगम

अ‍ॅडव्हॉन्टेज महाराष्ट्र एक्स्पोत उपयुक्तता, कल्पकतेचा संगम

googlenewsNext
ठळक मुद्दे४५० उद्योगांचे स्टॉलमध्ये विविध उत्पादनाने ठेवले आहेत. दुपारी २ वाजेनंतर सायंकाळी ७ वाजेपर्यंत सर्वांना पाहता येणार आहे.

औरंगाबाद : ‘गरज ही शोधाची जननी आहे’ असे म्हटल्या जाते. याचीच प्रचीती अ‍ॅडव्हॉन्टेज महाराष्ट्र एक्स्पोमध्ये येत आहे. आवश्यकता, उपयुक्तता अन् कल्पकता याचा संगम येथे मांडलेल्या प्रत्येक उत्पादनातून जाणवतो आहे. मराठवाडा मागासलेला आहे हे म्हणणे संपूर्णपणे खोडून टाकत येथील अफाट औद्योगिक क्षमतेचे प्रतिबिंब कलाग्राममध्ये भरलेल्या या भव्य प्रदर्शनातून बघण्यास मिळते आहे. 

मराठवाडा असोसिएशन आॅफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर (मसिआ) च्या वतीने चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत अ‍ॅडव्हॉन्टेज महाराष्ट्र एक्स्पो-२०२० ला गुरुवारी थाटात सुरुवात झाली. मराठवाड्याच्या मातीतून निर्माण झालेल्या उद्योजकांनी किती प्रगती केली आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली औद्योगिक उत्पादने आहेत. शिवाय  पायाभूत सुविधा व उद्योग वाढीसाठी येथील पोषक वातावरणाची सर्वसमावेशक माहिती देणारे हे प्रदर्शन मराठवाड्यातील नव्या औद्योगिक क्रांतीची नांदी ठरत आहे. प्रवेशद्वारासमोर विविध झाडांचा, हिरवळी व रांगोळीचा कल्पकतेने केलेला वापर यावरून या प्रदर्शनाच्या भव्य-दिव्यतेची चुणूक पाहण्यास मिळते. येथे ८ डोम उभारले आहेत. ४५० उद्योगांचे स्टॉलमध्ये विविध उत्पादनाने ठेवले आहेत. कलाग्राममध्ये विंग ‘ए’मध्ये हातमाग, हस्तकलेचा उत्तम नमुना वेगवेगळ्या स्टॉलवर दिसून येत आहे.

याशिवाय विविध सर्व्हिसेस, शैक्षणिक संस्था व बँकांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेले नवीन प्रोजेक्ट सादर केले आहेत. उद्योग उभारणीसाठीच्या कर्जाची माहिती देणारे बँकांचे स्टॉलही लावण्यात आले आहेत. ‘बी’ डोममध्ये एनर्जी, आॅटोमेशन, रोबोटिक्सवर आधारित उत्पादने आहेत. एक वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवणारे रोबोट, जॉबवर्क तयार करणारे रोबोट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. याशिवाय जालना येथे तयार होणाऱ्या ड्रायपोर्टची इत्थंभूत माहिती येथे दिली जात आहे. ‘सी’ डोममध्ये इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चरवर आधारित माहिती दिली जात आहे. ‘डी’ डोममध्ये इलेक्ट्रॉनिक्स टेडर्स तर ‘ई’ डोममध्ये आॅटो कंम्पोन्ट ठेवले आहे. येथे औरंगाबादेतील आॅटोमोबाईल सेक्टरची क्षमता बघण्यास मिळते. ‘एफ’ डोममध्ये मेकॅनिकल ट्रेड कंम्पोन्ट ठेवले आहे. तर अंतिम ‘जी’ डोममध्ये फूड अँड फ्रूट प्रोसेसिंग मशीन मॅन्युफॅक्चरिंग ठेवण्यात आले आहे. हे प्रदर्शन १२ जानेवारीपर्यंत सुरू राहील. सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत बिझनेस क्लाससाठी व दुपारी २ वाजेनंतर सायंकाळी ७ वाजेपर्यंत सर्वांना पाहता येणार आहे.

औद्योगिक जगताचे लक्ष वेधण्यासाठी प्रदर्शन
मराठवाडा मागासलेला नाही तर प्रगत भाग आहे. हे जगातील उद्योग जगताला दाखवून देण्यासाठी मसिआने प्रदर्शन भरविले आहे. याद्वारे येथील औद्योगिक क्षमता जगासमोर येत आहे. या प्रदर्शनाने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले असून, पहिल्याच दिवशी २० हजारांपेक्षा अधिक लोकांनी भेट दिली आहे. येत्या तीन दिवसांत देशातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधी या प्रदर्शनाला भेट देणार आहेत. या प्रदर्शनातून व्यवसायाला किती चालना मिळते हे तीन दिवसांत लक्षात येईल. 
- ज्ञानदेव राजळे, अध्यक्ष मसिआ

Web Title: Advantage Maharashtra Expo a combination of ingenuity and Utility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.