‘स्मार्ट सिटी’च्या सीईओ पदासाठी जाहिरात प्रसिद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:03 AM2021-03-04T04:03:41+5:302021-03-04T04:03:41+5:30
औरंगाबाद : स्मार्ट सिटीच्या सीईओपदी नगरविकास विभागाने मागील महिन्यात बाबासाहेब मनोहरे यांची नियुक्ती केली. त्यांच्या नियुक्तीला ८ दिवसही उलटत ...
औरंगाबाद : स्मार्ट सिटीच्या सीईओपदी नगरविकास विभागाने मागील महिन्यात बाबासाहेब मनोहरे यांची नियुक्ती केली. त्यांच्या नियुक्तीला ८ दिवसही उलटत नाहीत तोच नगरविकास विभागाच्या आदेशानुसार या पदाच्या भरतीसाठी चक्क जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे सीईओ पदाला आता नवीन वळण लागले आहे.
महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांकडेच आजपर्यंत स्मार्ट सिटीच्या सीईओ पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आलेला होता. आस्तिक कुमार पाण्डेय यांनी स्मार्ट सिटीच्या रखडलेल्या प्रकल्पांना गती दिली. सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक गेल्या महिन्यात नगरविकास विभागाने स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बाबासाहेब मनोहरे यांची प्रतिनियुक्तीवर बदली केली. त्यांच्या नियुक्तीचे पडसाद राजकीय व प्रशासकीय वर्तुळात उमटले. मनोहरे यांनी सीईओपदाची सूत्रे हाती घेतली. स्मार्ट सिटीच्या खर्चाचे लेखापरीक्षण, ‘सुपर संभाजीनगर’ फ्लेक्सची चौकशी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. हे प्रकरण ताजे असतानाच आता स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सीईओपदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ८ मार्च २०२१ पर्यंत सीईओपदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
काय म्हणाले महापालिका प्रशासक
या जाहिरातीबद्दल पत्रकारांनी महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांना विचारले असता ते म्हणाले की, नगरविकास विभागाची परवानगी घेऊनच जाहिरात काढण्यात आली आहे. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सीईओंनी महापालिकेचे आयुक्त किंवा प्रशासकांच्या अधिपत्याखाली काम करावे, असे स्मार्ट सिटी मिशन व नगरविकास विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद आहे. नगरविकास विभागाच्या आदेशानुसारच सीईओपदासाठी जाहिरात काढली आहे. त्यानुसार मुलाखत घेऊन त्या पदावर नियुक्ती केली जाईल. नियुक्तीला स्मार्ट सिटी बोर्डाची मान्यता घेऊन अंतिम मान्यतेसाठी नगरविकास विभागाला पाठविले जाईल.
लेखापरीक्षण करण्याचा निर्णय आमचाच
स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने गेल्या काही वर्षांत केलेल्या कामाचे ऑडिट करा, असे पत्र आपण पूर्वीच नागपूरच्या महालेखाकार (एजी ऑफिस) कार्यालयाला पाठविले आहे. अंतर्गत ऑडिट पूर्ण झाले असून तुम्ही तुमचे ऑडिट करा, असे त्यांना कळवले आहे असे आस्तिककुमार पाण्डेय यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.