जालना-जळगाव रेल्वे मार्गाचे आजपासून हवाई सर्वेक्षण; रडारद्वारे ४ दिवसांत होणार सर्वेक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 11:40 AM2022-05-14T11:40:08+5:302022-05-14T11:41:00+5:30
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी ट्विट करून जालना - जळगाव रेल्वे मार्गाच्या हवाई सर्वेक्षणासंदर्भात माहिती दिली.
औरंगाबाद : जालना-जळगाव या १७४ कि.मी. नव्या रेल्वे मार्गाच्या अंतिम भूखंड सर्वेक्षणासाठी (फायनल लोकेशन सर्व्हे) फेब्रुवारीत निधी मंजूर झाला. त्यानंतर सर्वेक्षणाला गती देण्यात आली. या मार्गाचे सर्वेक्षण भौतिकदृष्ट्या सुरू आहे. त्याबरोबरच आता १४ मे पासून हवाई सर्वेक्षणही केले जात आहे. विमानाद्वारे आगामी ४ दिवसांत हवाई सर्वेक्षण केले जाणार आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी ट्विट करून जालना - जळगाव रेल्वे मार्गाच्या हवाई सर्वेक्षणासंदर्भात माहिती दिली. भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत जालना-जळगाव रेल्वे मार्गाचा ‘फायनल लोकेशन सर्वे’ ८ फेब्रुवारी रोजी मंजूर केला गेला होता. या सर्वेक्षणाचे काम भौतिकदृष्ट्या (फिजिकली ) सुरूच आहे. त्याचबरोबर हवाई सर्वेक्षणासाठी अकोला येथे विमान दाखल झाले आहे. या विमानाद्वारे रडारचा (लिडार) वापर करून हवाई सर्वेक्षण केले जाणार आहे. १४ ते १७ मे या ४ दिवसांत हे सर्वेक्षण होणार आहे. हे विमान एका दिवसाला ५० कि. मी. सर्वेक्षण करणार आहे. यामुळे फायनल लोकेशन सर्वेक्षणाला गती मिळेल, असे या ट्वीटमध्ये रावसाहेब दानवे यांनी नमूद केले आहे. सर्वेक्षणासाठी त्यांनी ४.५ कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत.
भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत जालना-जळगाव रेल्वे मार्गाचा 'फायनल लोकेशन सर्वे' 8 फेब्रुवारी 2022 रोजी मंजूर केला गेला होता. या सर्वेचे काम भौतिकदृट्या / फिजीकली सुरुच आहे. त्याचबरोबर हवाई सर्वेसाठी अकोला येथे आज विमान दाखल झाले असुन (1/2) pic.twitter.com/ct6YacjlZ7
— Raosaheb Patil Danve (@raosahebdanve) May 13, 2022
असा जाणार मार्ग
अंतिम भूखंड सर्वेक्षण झाल्यानंतर मार्गाचा प्रस्ताव हा स्वीकृतीसाठी रेल्वे बोर्डाकडे जाईल. जालना- जळगाव रेल्वे मार्गामुळे मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील औद्योगिक विकासासह, शेती, व्यापार, दळणवळण, लघुउद्योग, पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. जालना, पिंपळगाव, पांगरी, राजूर, भोकरदन, सिल्लोडमार्गे, गोळेगाव, अजिंठा, फर्दापूर, जळगाव असा हा मार्ग जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
असा होणार फायदा
या रेल्वे मार्गाचा फायदा पुढे सूरत, गुजरात, राजस्थानच्या रेल्वे गाड्यांना आंध्रप्रदेश, दक्षिण भारताकडे जाण्यासाठी मार्ग म्हणून होणार आहे. अजिंठा हे ऐतिहासिक शिल्पकलेचे पर्यटनस्थळ, या रेल्वे मार्गामुळे येथे जगभरातील पर्यटकांसाठी रेल्वे प्रवासाची सोय होणार आहे. मराठवाड्याचे आराध्य दैवत राजूर महागणपती येथून हा रेल्वे मार्ग जात असल्याने या भागातील भाविकांसाठी सोयीचे ठरणार आहे.