१२ वर्षांच्या वनवासानंतर शिवाला मिळाली मायेची ऊब; पळशीच्या दाम्पत्याने घेतले दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:32 AM2018-03-15T00:32:32+5:302018-03-15T00:32:40+5:30
पळशी (ता. सिल्लोड) : जन्मदात्या आईने कचऱ्याच फेकले. एका साधूने मुंबईत नऊ वर्षे सांभाळ केला. नंतर हतनूर (ता. कन्नड)च्या महाराजाने तीन वर्षे सांभाळ केला. अशा साधूंच्या सहवासात वाढलेल्या शिवाला संगीत आणि भजनाची आवड जडली. याच संगीताने त्याला आई-बाबा मिळवून दिले. तब्बल १२ वर्षांच्या वनवासानंतर शिवाला आईच्या मायेची ऊब मिळाली. सिल्लोड तालुक्यातील पळशी येथील सुलोचना राऊत (४०), देवीदास राऊत (४५) या दाम्पत्याने त्याला ११ मार्च रोजी दत्तक घेतले.
अंबादास बडक
पळशी (ता. सिल्लोड) : जन्मदात्या आईने कचऱ्याच फेकले. एका साधूने मुंबईत नऊ वर्षे सांभाळ केला. नंतर हतनूर (ता. कन्नड)च्या महाराजाने तीन वर्षे सांभाळ केला. अशा साधूंच्या सहवासात वाढलेल्या शिवाला संगीत आणि भजनाची आवड जडली. याच संगीताने त्याला आई-बाबा मिळवून दिले. तब्बल १२ वर्षांच्या वनवासानंतर शिवाला आईच्या मायेची ऊब मिळाली. सिल्लोड तालुक्यातील पळशी येथील सुलोचना राऊत (४०), देवीदास राऊत (४५) या दाम्पत्याने त्याला ११ मार्च रोजी दत्तक घेतले.
शिवाच्या वनवासाची सुरूवात जन्मत:च म्हणजे १२ वर्षांपूर्वी झाली. मुंबई-कसारा घाटातील शिव मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी ६ वाजेच्या सुमारास एक साधू दर्शनाला जात असताना रस्त्याच्या कडेला कचरा कुंडीतून रडण्याचा आवाज आला. त्यांनी कुंडीत पाहिले तर नवजात अर्भक रक्ताने माखलेले आढळून आले. या साधूबाबांना दया आली व त्यांनी ते नवजात अर्भक सोबत घेऊन मुंबई गाठली. महादेवावर श्रद्धा असेल त्यांची. त्यामुळे शिवा नाव ठेवले. नऊ वर्षे त्याचा सांभाळ केला. या काळात साधूबाबांनी शिवाला त्र्यंबकेश्वर, वेरुळ, पंढरपूर या तीर्थस्थळाची दर्शनवारी घडविली. नऊ वर्षांनंतर त्या साधूबाबांनी शिवाला ‘तू आता तुझा उदरनिर्वाह करु शकतो, मला हिमालयात जायचे आहे, असे सांगत मुंबई रेल्वे स्टेशनवर सोडून ते निघून गेले. त्यानंतर शिवाने वर्षभर रेल्वे स्टेशनवर ‘कुली’चे काम केले. या दरम्यान त्र्यंबकेश्वरला जाण्याची इच्छा त्याच्या मनात जागृत झाली. त्याने कमावलेल्या पैशातून एक सायकल विकत घेतली व त्यावरुन त्र्यंबकेश्वर गाठले. काही दिवस तेथे राहिल्यानंतर सायकल विकून त्या पैशातून बसने वेरुळ गाठले. काही दिवस तेथेच राहिला. काम मिळाले नाही म्हणून तेथून खुलताबादला आला. खुलताबाद येथील एका हॉटेलमध्ये कामाला राहिला. काम करत असताना हॉटेल मालक संदीप बारगळ यांना त्याची कहाणी ऐकून गहिवरुन आले. त्यांनी स्थानिक पोलीस व गल्लेबोरगाव येथील सिद्धेश्वर महाराजांच्या मदतीने त्याला हतनूर (ता. कन्नड) येथील श्रीकृष्ण महाराज यांच्या आश्रमात पाठवले. महाराजांनी तेथे त्याचा मुलासारखा सांभाळ केला.
शिवाला संगीत व भजनांची आवड. बोधेगाव (ता. फुलंब्री) येथे २०१७ मध्ये महाशिवरात्रीला भजन स्पर्धा ठेवण्यात आली होती. यात शिवाने दुसरा क्रमांक मिळवला होता. पळशी येथील देविदास राऊत यांनाही संगीत व भजनाची आवड असल्याने योगायोगाने तेही या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित होते. शिवाच्या या कलेने देविदास यांच्या मनात घर केले. त्यांनी आपल्या पत्नीशी चर्चा करुन अनाथ शिवाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. श्रीकृष्ण महाराज यांना शिवाला दूर करु वाटले नाही. त्यांनी प्रेमापोटी टाळाटाळ केली. परंतु राऊत दाम्पत्याने हट्ट सोडला नाही. अखेर ११ मार्च रोजी या दाम्पत्याने शिवाला दत्तक घेतले. पळशीत आल्यानंतर गावात आनंद साजरा करण्यात झाला. गावकºयांसह परिसरातील नागरिकांमधून राऊत दाम्पत्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शिवाला आई-वडील मिळाल्याने तोही देवाची कृपा मानून सर्वांचे आभार मानत आहे.