१३ दिवसांनंतरही तपासाची औपचारिकताच!
By Admin | Published: January 15, 2017 11:21 PM2017-01-15T23:21:18+5:302017-01-15T23:22:34+5:30
अंबड : अंबड बाजार समिती सभापती सतीश होंडे यांच्या पत्नी सुमित्रा होंडे खून प्रकरणाला तब्बल १३ दिवस उलटून गेले आहेत.
अंबड : अंबड बाजार समिती सभापती सतीश होंडे यांच्या पत्नी सुमित्रा होंडे खून प्रकरणाला तब्बल १३ दिवस उलटून गेले आहेत. मात्र अद्यापही पोलीस तपासाची केवळ औपचारिकताच सुरु असल्याचे दिसून येत आहे.
या प्रकरणातील आरोपी विलास नानासाहेब होंडे याची १३ जानेवारी रोजी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर प्रकरण शांत होईल, असा सर्वांचा कयास होता. मात्र, १४ जानेवारी रोजी सुमित्रा होंडे यांचे वडील विश्वंभर तारख यांनी अंबड येथे पत्रकार परिषद घेऊन पोलिसांनी पैसे घेऊन घटनेचा तपास दिशाहीन केल्याने खून प्रकरणातील सत्य अद्यापही बाहेर आले नसल्याचा गंभीर आरोप करत पोलिसांच्या तपासाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणातील फिर्यादी विश्वंभर तारख यांनी सांगितले की, आपण स्वत: ११ जानेवारी रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सोनुने यांची भेट घेऊन त्यांना पुरवणी जवाब नोंदविला. यामध्ये सुमित्रा होंडे यांच्या खून प्रकरणात विलास व्यतिरिक्त सुमित्रा यांचे पती सतीश होंडे, दीर डॉ. भरत होंडे, जाऊ डॉ. सीमा होंडे, सासरे अण्णासाहेब होंडे व चुलत सासरे नानासाहेब होंडे यांची चौकशी करण्याची लेखी मागणी सोनुने यांच्याकडे केली. विशेष म्हणजे आपण ११ जानेवारी रोजीच काही पत्रकारांना पुरवणी जबाब दिल्याची माहिती दिली व आपल्या पुरवणी जबाबानुसार सुमित्रा यांच्या सासरच्या मंडळींची चौकशीची मागणी केल्याचे तारख यांनी सांगितले. मात्र, याविषयी पत्रकारांनी सोनुने यांच्याकडे विचारणा केली असता सोनुने यांनी असा कोणताही पुरवणी जबाब आला नसल्याचे सांगितले. आपण अधिक चौकशी केली असता आपला पुरवणी जबाब रेकॉर्डला घेतला नसल्याचे समजले. माझा पुरवणी जबाब दडविण्यामागे पोलिसांचा नेमका हेतु काय आहे. तसेच पुरवणी जबाब आल्यानंतरही तपास अधिकाऱ्यांनी होंडे कुटुंबीयांना चौकशीसाठी ताब्यात का घेतले नाही, असे विविध प्रश्न फिर्यादी तारख यांनी उपस्थित केले.
या प्रकरणाचा पोलीस तपास सुरुवातीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात राहिला आहे. विलासने सुमित्रा यांचा खून का केला, लोड केलेली रिव्हॉलव्हर कपाटात कोणी ठेवले, आपण सुमित्रा यांचा त्या झोपेत असताना गोळी झाडून खून केल्याचा जबाब विलास पोलिसांना दिला आहे. मात्र, रिव्हॉलव्हरवर कोणाच्याही हाताचे ठसे आढळले नाहीत, विलासने रिव्हॉलव्हरने गोळी झाडली असेल तर त्याच्या हातावर गन पावडर उडालेली का आढळली नाही, जर विलासने हँडग्लोज घालून रिव्हॉलव्हर हाताळले असेल तर न्यायालयात हँडग्लोजचा उल्लेख का करण्यात आला नाही. खुनाची कबुली दिल्यानंतर जवळपास नऊ दिवस विलास पोलीस कोठडीत होता. दरम्यान, हा खून का केला याविषयी विलास पोलिसांना दररोज वेगवेगळी कारणे सांगत असे, यापैकी विलासने सांगितलेले नेमकेकोणते कारण पोलिसांनी ग्राह्य धरले व का ग्राह्य धरले हीच पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडत आहे.