लग्नाच्या १८ वर्षांनंतर मातृत्व, तेही तिळ्यांचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 03:23 PM2020-01-01T15:23:37+5:302020-01-01T15:27:45+5:30
नैसर्गिक प्रसूती झाली असून माता आणि तिळ्यांची प्रकृती चांगली आहे
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कुठल्याही स्त्रीसाठी आई होण्याचा आनंद वेगळाच असतो. बाळ न झालेल्या स्त्रीला आजही अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागले. अशीच काहीशी वेळ एका महिलेवर ओढावली. मूल होण्यासाठी वैद्यकीय उपचारांसह उपासतापास, पूजाअर्चा अशा अनेक गोष्टी केल्या; परंतु मूल होण्याची प्रतीक्षाच करावी लागली. मात्र, अखेर लग्नाच्या १८ वर्षांनंतर तिला मातृत्व मिळाले. तेही तिळ्यांचे. तिच्यासह संपूर्ण कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
मनीषा अप्पासाहेब बढे (रा. बोरगाव, ता. कन्नड) असे १८ वर्षांनंतर मातृत्व मिळालेल्या मातेचे नाव आहे. त्यांचे पती अप्पासाहेब बढे हे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. लग्नानंतर इतरांप्रमाणे त्यांनीही मूल होईल, त्याला अगदी लाडाने वाढवू, अशी स्वप्ने रंगवली; परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते. एक-एक वर्ष सरत होते; परंतु मूल होण्याची केवळ प्रतीक्षाच करावी लागली. बाळ न झालेल्या महिलेच्या मनातही अपराधीपणाची भावना असते. आई होणे हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक गोड अनुभव. आई होण्याचा प्रवास खडतर असला तरी त्यादरम्यान जी उत्सुकता, आनंद मनात असतो त्याला तोड नाही. पोटात जाणवणारी ती बाळाची हालचाल, कधी गुदगुल्या, तर कधी कळ. मात्र, या सगळ्याची मनीषा बढे यांना नुसती वाट पाहावी लागत होती. वैद्यकीय उपचार, पूजापाठ असे अनेक उपाय केले. लोक जे काही सांगत ते करीत. मात्र, मातृत्वाच्या प्रतीक्षेत एक-एक दिवस काढण्याची वेळ येत होती.
अखेर लग्नाच्या १८ वर्षांनंतर मातृत्वाच्या आनंदाने त्याच्या जीवनात प्रवेश केला. बाळाच्या आगमनाची चाहूल लागली आणि संपूर्ण कुटुंब, नातेवाईकांमध्ये आनंद पसरला. प्रसूती कळाच्या वेदनेने २४ डिसेंबर रोजी घाटीतील प्रसूती विभागात दाखल झाल्या. नैसर्गिक प्रसूती झाली आणि त्यांनी तिळ्यांना जन्म दिला. तिन्ही मुले आहेत. १८ वर्षांनंतर आई झाल्याने मनीषा यांच्या जीवनात आनंद पसरला. आयुष्याचे सार्थक झाले, अशीच काहीशी त्यांची भावना झाली. नवजात शिशूंचे वजन कमी असल्याने त्यांच्या नवजात शिशू विभागात उपचार सुरू आहेत. बाळांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा, नवजात शिशुचिकित्साशास्त्र विभागाचे डॉ. अमोल जोशी, डॉ. अतुल लोंढे आदींच्या मार्गदर्शनाखाली बाळांवर उपाचार सुरू आहेत.
आनंदाश्रू : इतर नातेवाईकांना मुले झाली, ती मोठीही झाली; परंतु भावाला १८ वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. या क्षणाने कुटुंबातील प्रत्येक जण आनंदी झाला आहे, असे अप्पासाहेब यांच्या बहीण पुष्पा गायकवाड यांनी सांगितले. आई होणे यापेक्षा कोणता आनंद नाही, असे मनीषा बढे म्हणाल्या. अनेक ठिकाणी वैद्यकीय उपचार घेतले. तिळे झाल्याचा आनंद शब्दातही सांगता येत नसल्याचे अप्पासाहेब बढे म्हणाले.