२० दिवसानंतर चिमुकला आईच्या कुशीत विसावला; पोलिसात तक्रार दिल्याने पतीने केले होते दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2022 12:58 PM2022-01-15T12:58:40+5:302022-01-15T12:59:11+5:30
दामिनी पथकाकडून मदतीचा हात मिळाल्याने २० दिवसांनंतर मातेची बाळासोबत भेट झाली
औरंगाबाद : पतीसोबत झालेल्या वादामुळे प्राध्यापिकेने महिला तक्रार निवारण केंद्रात (भरोसा सेल) तक्रार दिल्याने संतापलेल्या पतीसह सासरच्या मंडळींनी विवाहितेच्या ताब्यातील तिचे दोन वर्षांचे बाळ हिसकावून घेतले. या प्रकारामुळे कासावीस झालेल्या मातेची तब्बल २० दिवसांनंतर दामिनी पथकाच्या माध्यमातून भेट झाली. यादरम्यान बाळ मातेच्या ताब्यात दिल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.
उच्चशिक्षित असलेल्या मुकुंदवाडीतील व्यक्तीसोबत एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या महिलेचा विवाह झाला होता. गेल्या काही दिवसापासून दोघांत कौटुंबिक वाद सुरू होते. या वादातून प्राध्यापिकेने पतीच्या विरोधात भरोसा सेलकडे तक्रार दिली होती. या प्रकारामुळे संतापलेल्या पतीने दोन वर्षांचे बाळ पत्नीकडून हिसकावून घेत स्वत:च्या ताब्यात ठेवले. त्यामुळे त्रस्त झालेल्या प्राध्यापिकेने गुरुवारी सायंकाळी भरोसा सेल गाठत बाळ मिळविण्यासाठी नियंत्रण कक्षाकडे मदत मागितली. त्यानुसार दामिनी पथकाच्या प्रमुख उपनिरीक्षक सुवर्णा उमाप, अंमलदार निर्मला निभाेंरे, गिरीजा आंधळे यांनी भरोसा सेलकडे धाव घेत मदतीच्या अपेक्षेने आलेल्या प्राध्यापिकेला धीर देत विचारपूस केली.
संबंधित महिलेने पोलीस कर्मचाऱ्यांना सर्व आपबिती सांगितली. मी पतीविरुद्ध महिला तक्रार निवारण केंद्रात अर्ज दिला होता. त्यामुळे माझे दोन वर्षाचे बाळ नवऱ्याने माझ्याकडून हिसकावून घेतले. गेल्या २० दिवसांपासून मला बाळाला भेटू देत नाही तसेच त्याला आणूनसुद्धा सोडत नाहीत. या प्रकारामुळे मी त्रस्त असून मला माझ्या बाळाची भेट घडवून द्या, अशी विनंती प्राध्यापक महिलेने पथकाला केली. यानंतर दामिनी पथकाने गुरुवारी सांयकाळी प्राध्यापिकेला पथकाच्या गाडीत बसवून बाळ असलेल्या पतीचे घर गाठले. त्याठिकाणी तिच्या नवऱ्यासह सासरच्या लोकांना पथकाने कायदेशीर बाबी समजावून सांगितल्यानंतर पतीने ते दोन वर्षांचे बाळ आईकडे देण्यास होकार दिला.
अन् आनंदाश्रू वाहिले
बाळ आणि आईची भेट होताच प्राध्यापिकेच्या डोळ्यातून काही क्षणातच आनंदाश्रू वाहिले. पोलिसांनी कोणासोबत रहायचे असे बाळाला विचारताच त्याने आईसोबत राहायचे, असा इशारा करीत चप्पल घालून घराबाहेर पडले. हा क्षण पाहून प्राध्यापक मातेला अधिक रडू कोसळल्याचे उपस्थितांनी सांगितले.