२५ वर्षांनंतरही वारस भरपाईपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 11:44 AM2018-04-26T11:44:25+5:302018-04-26T11:46:55+5:30
पंचवीस वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (२६ एप्रिल १९९३) कापसाने भरलेल्या ट्रकच्या वरच्या भागाला चाक अडकून इंडियन एअर लाईन्सच्या विमानाला औरंगाबादेत अपघात झाला होता.
- प्रभूदास पाटोळे / प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : पंचवीस वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (२६ एप्रिल १९९३) कापसाने भरलेल्या ट्रकच्या वरच्या भागाला चाक अडकून इंडियन एअर लाईन्सच्या विमानाला औरंगाबादेत अपघात झाला होता. यात ५५ प्रवासी ठार झाले होते. या दुर्घटनेला २५ वर्षे पूर्ण झाली तरी मृतांच्या वारसांना अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही.
विशेष म्हणजे मृतांच्या वारसांपैकी कमलादेवी आनंदराम जव्हरानी आणि त्यांचे पती आनंदराम हरिओम जव्हरानी यांच्या वारसांना दिवाणी न्यायालयात २०१३ साली ७ लाख ६३ हजार ५६१ रुपये ९ टक्के व्याजासह अदा करण्याचा आदेश दिला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार प्रतिवादी इंडियन एअर लाईन्स कॉर्पोरेशन लि. यांनी न्यायालयात ‘डिक्रीची’ रक्कम २०१४ साली जमा केली होती. मात्र, इंडियन एअर लाईन्स कॉर्पोरेशन लि. यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केल्यामुळे मृतांच्या वारसांना ती रक्कम अद्याप मिळाली नाही. या अपिलावर २७ एप्रिल २०१८ रोजी खंडपीठात सुनावणी होणार आहे. त्यातील आदेशानंतरच वारसांना ही रक्कम मिळू शकेल. या अपघातातमृत्यू पावलेले अरुण जोशी, जव्हरानी पती-पत्नी आदी पाच जणांच्या वारसांच्या वतीने अॅड. दिनेशभाई एल. वकील आणि अॅड. लहरीमनोहर डी. वकील, तर सेठ नंदलाल धूत आणि दीपक मुनोत यांच्या वारसांच्या वतीने अॅड. अनिल बजाज आणि अपिलार्थी इंडियन एअर लाईन्स कॉर्पोरेशन लि. च्या वतीने अॅड. जगदीश व्ही. देशपांडे खंडपीठात काम पाहत आहेत.
पायलट निर्दोष
देशभरात गाजलेल्या या अपघातातील विमानाचा पायलट कॅप्टन शिवनारायण सिंग याच्याविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात ‘निष्काळजीपणे विमान उडवून ५५ लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी’ भा.दं.वि. कलम ३०४ (अ) आणि ‘इतरांचे जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या कृतीने दुखापत पोहोचवल्या प्रकरणी’ ३३७ तसेच इंडियन एअरक्राफ्ट कायद्याचे कलम ११ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र, २०११ साली न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केले होते, असे त्यांचे वकील जगदीश व्ही. देशपांडे यांनी सांगितले.
तीनदा अपघातातून वाचलो
चिकलठाणा विमानतळावरून विमानाने उड्डाण घेताच तीन मिनिटांत दुर्घटना घडली. त्यावेळेस धावपट्टी लहान होती. तापमान वाढलेले होते. जास्त उंचीवर नसल्याने विमानाचा स्पर्श ट्रकला झाला आणि मागचे एक चाक निखळून पडले. विमान भरकटले ते उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीवर आदळताच स्फोट झाला. आम्ही उडी मारल्यामुळे वाचलो. सर्व नकारात्मक गोष्टी एकत्र आल्याने हा विचित्र अपघात घडला. त्यापूर्वी जून १९९१ मध्ये ढगाळ वातावरणात चिकलठाणा विमानतळावर आमचे विमान धावपट्टीवर उतरत असताना अंधुक प्रकाशामुळे वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज आला नाही व विमान चिखलात जाऊन रुतले होते. त्यानंतर तिसऱ्या वेळी मुंबई-जयपूर-उदयपूर-दिल्ली या विमानासही अपघात झाला होता. जयपूरहून उदयपूरला विमान जात असताना विंडशेड निघाले यामुळे विमानाला तात्काळ धावपट्टीवर उतरविण्यात आले. या तिन्ही अपघातातून मी सुखरूप वाचलो.
रुग्णवाहिकेतून उतरून आई-वडिलांची घेतली भेट
विमानाचा स्फोट झाला तेव्हा माझ्या नाका व तोंडावाटे विषारी धूर शरीरात गेला होता. यामुळे मला अंधाऱ्या आल्या. डॉ. हेडगेवार हॉस्पिटलमध्ये मला अॅडमिट केले. रक्तातील आॅक्सिजन कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि पुढील वैद्यकीय उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये नेण्याचे त्याच दिवशी ठरले. मी डॉक्टरांना विनंती केली की, तत्पूर्वी मला घरी आई-वडिलांची भेट घ्यायची आहे. त्यानुसार डॉक्टरांनी एन-३ येथील माझ्या घराच्या बाजूच्या गल्लीत रुग्णवाहिका थांबविली तेथून कपडे बदलून मी कारमध्ये बसलो व घरी येऊन आई-वडिलांना भेटलो व मी सुखरूप आहे; पण मला आता कामानिमित्त पुण्याला जावे लागणार असे सांगून पुन्हा कारमधून शेजारी गल्लीत ठेवलेल्या रुग्णवाहिकेसमोर आलो. तेथे मला आॅक्सिजन लावून पुण्याला नेण्यात आले. आई-वडिलांना दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात वाचून अपघात झाल्याची घटना कळली; पण मी सुखरूप असल्याचे त्यांनी पाहिले होते, यामुळे मोठा धक्का बसला नाही. त्यानंतर १० दिवसांनी उपचार करून मी घरी आलो.
- अनिल भालेराव, अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान
अजूनही अंगावर शहारे येतात...
वर्षांपूर्वी विमान अपघातातून मी वाचलो. मात्र, तो क्षण आठवला की, अजूनही माझ्या अंगावर शहारे येतात. २६ एप्रिल १९९३ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास हिरापूरवाडीपासून अलीकडे चिकलठाणा हद्दीत विमानास अपघात झाला. विमान खाली कोसळले. या दुर्घटनेत ५५ जणांचा बळी गेला. या घटनेस २५ वर्षे होत आहे; पण अजूनही औरंगाबादकरांच्या मनात त्या चिरकाल आठवणी राहिल्या आहेत. उच्चदाबाच्या विद्युतवाहिनीला विमानाचा स्पर्श होताच स्फोट झाला. तेव्हा विमानात सर्वत्र प्रचंड धूर पसरला होता. आम्ही मध्यभागी बसलो होतो. लगेच आम्ही खाली उड्या मारल्या म्हणून वाचलो. मृत्यूच्या दाढेतून परत आलो. नशीब बलवत्तर होते. आम्ही काही बोटावर मोजण्याइतकेच वाचलो; पण अन्य ५५ जणांचा मृत्यू झाला. हे दु:ख मनात अजूनही घर करून बसले आहे.
- अरुण मुगदिया, सरचिटणीस, प्रदेश काँग्रेस कमिटी
बोनस आयुष्य जगतोय
एप्रिल १९९३ चा तो दिवस आठवला की, अजूनही माझ्या अंगावर काटे येतात. विमान अपघाताचा तो काही सेकंदाचा क्षण होता. मात्र, अजूनही ती दुर्घटना आठवली की, मन सुन्न होते. त्या घटनेचा विचार किंवा विश्लेषण करणे कठीण जाते. शब्दच सूचत नाहीत. माझे मित्र, जिंतूरचे तत्कालीन नगराध्यक्ष वसंत शिंदे हे माझ्यासोबत विमान प्रवासात होते. दोघांनी विमानातून उडी मारल्याने आम्ही वाचलो. देवाची कृपा, आई-वडील पुण्याई व जनतेच्या आशीर्वादामुळे आम्ही त्या दुर्घटनेतून बाहेर पडलो. त्या घटनेला २५ वर्षे पूर्ण झाली. आम्ही बोनस आयुष्य जगत आहोत.
- रामप्रसाद बोर्डीकर, माजी आमदार (जिंतूर)
नातेवाईकांच्या वेदना
२५ वर्षे झाली; पण न्याय मिळाला नाही
राजेंद्र मोटर्सचे दीपक मुनोत यांना रेल्वेने मुंबईला जायचे होते; मात्र महत्त्वाचे काम असल्याने निर्णय बदलून त्यांनी २६ एप्रिल १९९३ रोजी विमानाने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. चिकलठाणा विमातळावरून दुपारी विमानाने उड्डाण केले; पण काही वेळातच या विमानाचा अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत माझे बंधू दीपक मुनोत यांचा मृत्यू झाला. या घटनेला २५ वर्षे होत आहेत; पण दोषींना अजूनही शिक्षा झाली नाही. अजूनही निकाल न्यायप्रविष्ट आहे. हीच आमची खंत आहे.
- अरुण मुनोत (दीपक मुनोत यांचे भाऊ)
दर्शन करून निघाले होते...
उद्योगपती पी.यू.जैन ठोले यांचे धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोठे कार्य होते. कचनेर येथील चिंतामणी पार्श्वनाथ भगवंतांच्या दर्शनासाठी ते मुंबईहून आले होते. ते कचनेर ट्रस्टचे अध्यक्ष होते. आचार्य वर्धमानसागरजी महाराजांचे दर्शन घेऊन पी. यू. जैन व त्यांची पत्नी सरोज २६ एप्रिल रोजी दुपारी मुंबईला रवाना होण्यासाठी विमानात बसले होते. आम्ही त्यावेळेस मुंबईला होतो. अपघाताची बातमी कळताच माझे वडील व नातेवाईकांनी विमानतळ गाठले. माझ्या वडिलांनी पी.यू.जैन ठोले व सरोज जैन यांचा मृतदेह ओळखला. त्यांना चार मुली. त्यातील पहिली मुलगी मनीषाचे लग्न झाले होते. बाकीच्या तीन मुली आरती, भारती, कीर्ती या तिळ्या मुली होत्या. त्यांचेही नंतर लग्न झाले. पी.यू.जैन ठोले यांनी त्यांच्या वडिलांच्या नावाने उत्तमचंद ठोले जैन छात्रालयाची उभारणी केली होती. त्यांचे धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्य लक्षात घेऊन १९९३ मध्येच औरंगाबादेतील जैन शिक्षण संस्थेचे नामकरण पी.यू.जैन विद्यालय असे करण्यात आले.