मतमोजणीच्या २७ फेऱ्याअंती ठरणार औरंगाबादचा खासदार; एक हजार कर्मचारी लागणार

By विकास राऊत | Published: May 21, 2024 12:59 PM2024-05-21T12:59:29+5:302024-05-21T13:00:28+5:30

१२ लाख ९९ हजार ४० मतदारांनी कुणाला कौल दिला आहे, यासाठी २७ फेऱ्याअंती मतमोजणी करून निकाल लागणार आहे.

After 27 rounds of counting of votes, the MP of Aurangabad will be elected; A thousand employees will be required | मतमोजणीच्या २७ फेऱ्याअंती ठरणार औरंगाबादचा खासदार; एक हजार कर्मचारी लागणार

मतमोजणीच्या २७ फेऱ्याअंती ठरणार औरंगाबादचा खासदार; एक हजार कर्मचारी लागणार

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून कोण बाजी मारणार, यावरून सट्टाबाजार गरम झालेला आहे. तसेच राजकीय वर्तुळात रोज नव्याने आकडेमोड होत आहेत. बूथनिहाय मतदानाच्या आकड्यांवरूनही राजकीय धुरीण आपलाच उमेदवार निवडून येणार असा दावा करीत आहेत, तर दुसरीकडे प्रशासन ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या तयारीला लागले आहे. १२ लाख ९९ हजार ४० मतदारांनी कुणाला कौल दिला आहे, यासाठी २७ फेऱ्याअंती मतमोजणी करून निकाल लागणार आहे. ४८ हजार ११२ मते प्रत्येकी एका फेरीत मोजली जाणार आहेत. साधारणत: दुपारनंतर चित्र स्पष्ट होईल. १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ४ जूनची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे. बीडबायपास परिसरातील एमआयटी कॉलेजच्या आवारातील एका इमारतीत मतमोजणी होईल.

२०४० मतदान केंद्रांवरील बॅलेट युनिट येथील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आले आहेत. मतमोजणीच्या दिवशी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना सकाळी ६ वा. रुजू व्हावे लागेल. सकाळी ७ वाजता गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर ८ वाजता पोस्टल मतमोजणीला सुरुवात होईल. त्यानंतर ८:३० वाजता मतमोजणीस प्रारंभ होईल.

मतमोजणी प्रतिनिधी कसे येणार....
उमेदवारांना मतमोजणी टेबलासाठी एक प्रतिनिधी नियुक्त करण्याची मर्यादा आहे. ३१ मे पर्यंत आवश्यक कार्यवाही करून ओळखपत्र संबंधितांना घेणे आवश्यक आहे. प्रतिनिधींना ओळखपत्र तसेच अर्जासोबत उमेदवारांनी नियुक्तीसाठी दिलेले पत्र सोबत बाळगावे लागेल. प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रात सकाळी सात वाजेपर्यंतच प्रवेश मिळेल. त्यांना चैतन्य टेक्नो स्कूल येथून केंद्रात येण्यासाठी प्रवेशद्वार आहे. निवडणूक संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकार, इतर माध्यम प्रतिनिधींना एमआयटी कॉलेजच्या फूड टेक्नॉलॉजी विभाग येथून केंद्रात जाता येईल. मत मोजणी केंद्रात मोबाइल नेण्यास मनाई आहे, तर माध्यम प्रतिनिधींना मीडिया सेंटरमध्ये मोबाइल नेता येईल. कर्मचारी व माध्यम प्रतिनिधींसाठी वाहन पार्किंग तेथेच असेल, असे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी सांगितले.

काय असेल मतमोजणी केंद्रावर
विधानसभानिहाय १४ टेबल
विधानसभानिहाय पोस्टलसाठी १० टेबल
मतमोजणीसाठी १ हजारहून अधिक अधिकारी, कर्मचारी
पहिले रॅण्डमायझेशन २७ मे रोजी
२८ मे रोजी मतमोजणीचे प्रशिक्षण
४ जून रोजी मतमोजणी केंद्रात शेवटचे प्रशिक्षण

सीसीटीव्हीच्या निगराणीत बॅलेट युनिट...
मतदान यंत्रे एमआयटी कॉलेज परिसरातील एका इमारतीतील स्ट्रॉंग रूममध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत आहेत. केंद्रीय सशस्त्र पोलिस बल, राज्य राखीव पोलिस बल व राज्य पोलिस दलाचे अधिकारी व जवान अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीत आहे.
-देवेंद्र कटके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

किती फेऱ्या होणार...
कन्नड २६ फेऱ्या : २ लाख १७ हजार ८९
औरंगाबाद मध्य २३ फेऱ्या : २ लाख ११ हजार ५००
औरंगाबाद पश्चिम २७ फेऱ्या : २ लाख ३५ हजार ७८४
औरंगाबाद पूर्व २२ फेऱ्या : २ लाख ६ हजार ६३३ मतदान
गंगापूर २५ फेऱ्या : २ लाख २७ हजार १५२
वैजापूर २५ फेऱ्या : २ लाख ८८२
एकूण : १२ लाख ९९ हजार ४०

Web Title: After 27 rounds of counting of votes, the MP of Aurangabad will be elected; A thousand employees will be required

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.