३० तासांनंतर प्रहारचे आंदोलक उतरले जलकुंभावरून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:24 AM2020-12-17T04:24:10+5:302020-12-17T04:24:10+5:30

औरंगाबाद : शेतकऱ्यांविरुद्ध अपशब्द काढणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जाहीर माफी मागावी व शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, ...

After 30 hours, the protesters came down from Jalkumbh | ३० तासांनंतर प्रहारचे आंदोलक उतरले जलकुंभावरून

३० तासांनंतर प्रहारचे आंदोलक उतरले जलकुंभावरून

googlenewsNext

औरंगाबाद : शेतकऱ्यांविरुद्ध अपशब्द काढणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जाहीर माफी मागावी व शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, यासह अन्य मागण्यांसाठी गुरुवारी दुपारपासून शिवाजीनगर जलकुंभावर प्रहार जनशक्ती पक्षाने सुरू केलेले आंदोलन आज सायंकाळी ६.३० वाजता तब्बल ३० तासांनंतर संपले. आंदोलन सुरू झाल्यापासून जलकुंभस्थळी बंदोबस्त करणाऱ्या पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

जिल्हाधिकारी कार्यालयात सायंकाळी झालेल्या बैठकीत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दानवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आणि अन्य मागण्यांसाठी स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आंदोलक सुधाकर शिंदे यांनी दिली. यामुळे आंदोलन स्थगित केल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चीन आणि पाकिस्तानचे हस्तक असल्याचे विधान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते. दानवे यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी, यासह अन्य मागण्यांसाठी प्रहारच्या सुमारे ३० कार्यकर्त्यांनी गुरुवार दुपारपासून शिवाजीनगर जलकुंभावर चढून आंदोलन सुरू केले होते. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एका आंदोलकाने अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. यानंतर आंदोलकांनी जलकुंभावर दानवे यांचे दोन पुतळे जाळले. तेथे पडून असलेल्या प्लास्टिक टप आणि अन्य वस्तूही जाळल्या. पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विनंतीनंतरही गुरुवारी आंदोलन मागे घेतले नाही.

या कार्यकर्त्यांनी थंडीतही रात्री जलकुंभावर जेवण करून मुक्काम केला. पोलीस निरीक्षक पाटील, सपोनि. श्रद्धा वायदंडे, पोउपनि. भरत पाचोळे आणि कर्मचारी मदन, चव्हाण, दंडवते, अग्निशामकचे विजय राठोड, भगत आदींची उपस्थिती होती.

रात्रीतून उरले निम्मे आंदोलक

रात्री दहा ते पंधरा आंदोलक जलकुंभावरून उतरून निघून गेले. शुक्रवारी सकाळपासून १४ जणांनी पुन्हा घोषणा देत आंदोलन सुरू केले. दुपारी तहसीलदार दत्ता भारस्कर हे आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांशी फोनवरून चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. आंदोलकांनी पालकमंत्र्याची भेट मागितली. तहसीलदार दत्ता भारस्कर आणि पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले की, आमच्या वरिष्ठांचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे झाले.

कॅप्शन ..

प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते जलकुंभावर निदर्शने करताना.

Web Title: After 30 hours, the protesters came down from Jalkumbh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.