अंधारलेल्या बरड वस्तीवर ३० वर्षांनंतर पोहोचला प्रकाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:05 AM2021-06-22T04:05:55+5:302021-06-22T04:05:55+5:30
सिल्लोड : तालुक्यातील अनाड येथून जवळच तीस वर्षांपूर्वी बरड वस्ती वसली आहे. तेव्हापासून या वस्तीवर ना वीज होती, ना ...
सिल्लोड : तालुक्यातील अनाड येथून जवळच तीस वर्षांपूर्वी बरड वस्ती वसली आहे. तेव्हापासून या वस्तीवर ना वीज होती, ना पाणीपुरवठ्याची व्यवस्था. दैनिक लोकमतने यावर ५ जून रोजी वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. यानंतर तीस वर्षानंतर या वस्तीवर वीज पोहोचली आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी रात्री अंधारातच स्वीच ऑन करुन येथे विजेचा शुभारंभ केला. यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
बरड वस्तीत गेल्या ३० वर्षांपासून केवळ अंधारच नव्हता, तर येथील नागरिकांना तेव्हापासून ना रेशन कार्ड आहे, ना पाणीपुरवठ्याच्या कोणत्याही सुविधा. तरीही बाराशे लोकवस्तीचे हे गाव अंधारातून आपला मार्ग शोधत होते. अनाड ग्रामपंचायतीने या गावाला कोणत्याही सुविधा न दिल्याने तसेच येथे कोणतेही विकास कामे न केल्याने हे गाव दुर्लक्षित होते. बरड वस्तीतील गजानन गदाई, मनीषा मानकर, संदीप मानकर, भटका जोशी समाजाचे मराठवाडा अध्यक्ष विष्णू मुके, बाबासाहेब गोंडे या तरुणांनी वस्तीवरील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी शासन स्तरावर लढा देत होते. दैनिक लोकमतने या गावची व्यथा ५ जून २०२१ रोजी ‘ना वीज ना पाणी तरीही तेथे तीस वर्षांपासून मुक्कामी’ या मथळ्याखाली मांडली. यानंतर प्रशासन जागे झाले. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली, व सोमवारी या गावात प्रथमच विजेचे आगमण झाले. राज्यमंत्री अब्दुल सत्तार व जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री ८ वाजता अंधारातच स्वीच सुरु करताच प्रथमच बरड वस्ती लखलखून निघाली. यावेळी महावितरण मुख्य अभियंता भुजंगराव खंदारे, उप नगराध्यक्ष अब्दुल समीर, उपविभागिय अधिकारी ब्रिजेश पाटील, उपविभागिय पोलिस अधिकारी विजय मराठे, तहसिलदार विक्रम राजपूत, सोयगावचे तहसिलदार प्रविण पांडे, अशोक सूर्यवंशी, दुर्गाबाई पवार, नजीर अहेमद, दीपक अस्तुरे, विजय पगारे, संजय आकोडे उपस्थित होते.
चौकट
वस्तीतील सर्वांना मिळणार रेशन कार्ड
बरड वस्तीतील लोकांच्या नावाने नमुना नंबर ८ दिले जाईल जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. तसेच गावाला तात्काळ नवीन पाणी पुरवठा योजना दिली जाणार असून पाण्याच्या टाकीसाठी दहा लाख रुपये दिले जाईल. चार महिन्यांत गावात पाणी पोहोचविणार तसेच ज्यांना घरे नाहीत, त्यांच्यासाठी घरे मिळवून देण्यासाठी मदत केली जाईल. सर्वांना रेशन कार्ड दिले जाईल, असे आश्वासन राज्यमंत्री सत्तार यांनी दिले. यावेळी २० लोकांना प्राथमिक स्वरुपात रेशनकार्ड देण्यात आले.
फोटो : बरड वस्ती येथे स्वीच ऑन करून विजेचा शुभारंभ करताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आदी.
210621\img-20210621-wa0397_1.jpg
बरड वस्ती येथे स्वीच ऑन करुन विजेचा शुभारंभ करताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आदी.