छत्रपती संभाजीनगरात ४२ दिवसांनंतर बरसल्या जलधारा
By विकास राऊत | Published: September 7, 2023 12:17 PM2023-09-07T12:17:01+5:302023-09-07T12:17:27+5:30
१५० मि.मी. पावसाची तूट : २३ दिवस राहिले पावसाचे
छत्रपती संभाजीनगर : शहर व परिसरात ४२ दिवसांनंतर श्रीकृष्ण जन्माष्टमीला पावसाने हजेरी लावली. २६ जुलैपासून पावसाने दडी मारली होती. ऑगस्ट महिन्यांत एक-दोन दिवस वगळता पूर्णत: पावसाचा खंड होता. सप्टेंबर महिन्यांतही ५ तारखेपर्यंत पाऊस झाला नव्हता. बुधवारी सकाळी काही मिनिटांपुरता शहरातील तुरळक भागांत पाऊस झाला. १.४ मि.मी पावसाची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली. ढगांच्या गर्दीसह बुधवारी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. बुधवारी कमाल ३२.५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २० अंश सेल्सिअस होते. त्यानंतर आज सकाळपासून शहरासह जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे.
शहर व परिसरावर ४२ दिवसांनी आभाळ दाटून आले. बुधवारी सकाळी काही भागांत रिमझिम, तर काही भागांमध्ये हलक्या सरी बरसल्या. हळूहळू वातावरणाचा नूर पालटत गेला. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ५८१ मिमी असून, आजवर २६० मिमी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी ४७० मिमी पाऊस या तारखेपर्यंत झाला होता. या तुलनेत सुमारे १५० मिमी पावसाची तूट आहे. पावसाळ्यातील जून, जुलै व ऑगस्ट महिन्यांतील ९० पैकी ५० दिवस कोरडे गेले. ऑगस्ट महिन्यांत सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. खरीप हंगामातील पिकांसह जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांसह जायकवाडी धरणातील साठ्यांवर परिणाम झाला आहे.