जालना रोडवर थरार! ४५ मिनिटांच्या पाठलागानंतर कुख्यात मंगळसूत्र चोरटे पोलिसांच्या हाती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 12:43 PM2022-06-16T12:43:56+5:302022-06-16T12:50:36+5:30
सिनेस्टाइल पाठलाग करून मंगळसूत्र चोरांना धरले; औरंगाबाद शहर पोलिसांना जालना एलसीबीची मदत
औरंगाबाद : वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळून जाणाऱ्या सुसाट दुचाकीस्वार दोन चोरट्यांना गुन्हे शाखेच्या दोन कर्मचाऱ्यांनी केम्ब्रिज चौक ते जालना टोलनाका असा दुचाकीने सिनेस्टाइल पाठलाग करून पकडले. पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती मिळाल्यापासून अवघ्या ४५ मिनिटांत चोरटे पोलिसांच्या हाती लागले. या कारवाईसाठी जालना स्थानिक गुन्हे शाखेची मोठी मदत झाल्याचे शहर पेालिसांनी सांगितले.
कृष्णा शेषराव जाधव (२७, रा. असोला, तिंदारा, जि. परभणी) आणि राहुल शेषराव खरात (२५, रा. लोकाशानगर, परभणी) अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. गारखेडा परिसरातील शैलजा विजय देवडीकर या त्यांच्या दोन मैत्रिणींसह मंगळवारी दुपारी वटसावित्री पौर्णिमेनिमित्त पूजा करण्यासाठी जात होत्या. कालिका मंदिर ते जानकी हॉटेल रस्त्यावर दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि बेन्टेक्सचा हार हिसका देऊन तोडून नेला.
या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला १२ वाजून ३५ मिनिटांनी मिळाली. वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी मंगळसूत्र चाेर सक्रिय होतात, हे लक्षात घेऊन गुन्हे शाखेची ९ पथके शहराच्या प्रवेशद्वारांवर तैनात होती. या पथकाला चोरट्यांचे वर्णन आणि दुचाकीचा रंग कळविला. ताेपर्यंत संशयित चोरटे केम्ब्रिज चौकातून जालन्याच्या दिशेने जात असल्याचे तेथे तैनात पोलीस हवालदार संजय नंद आणि अधाने यांना दिसले. हे त्यांनी गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांना सांगून चोरट्यांचा पाठलाग करीत असल्याचे सांगितले.
चोरटे २२० सीसी क्षमतेच्या दुचाकीने सुसाट जात होते. पोलिसांपेक्षा ते सुमारे तीन ते चार किमी अंतरावर असून, त्यांचा वेग कमी होत नसल्याचे नंद यांनी वरिष्ठांना सांगितले आणि पाठलाग सुरूच ठेवला. आघाव यांनी जालन्याचे अपर पोलीस अधीक्षक आणि एलसीबीचे निरीक्षक सुभाष भुजंग यांना फोनवर हे कळविले. बदनापूर पोलिसांनी अडविण्यासाठी बॅरिकेड्स लावण्यापूर्वीच चोर पुढे निघाले. तिकडे जालना एलसीबीचे पथक जालन्याजवळील टोलनाक्यावर थांबले होते. काही मिनिटांतच औरंगाबादकडून आलेले दुचाकीस्वार चोर त्यांनी धरले. पाठोपाठ त्यांच्या मागावर असलेले हवालदार नंद आणि अधाने हेही तेथे पोहोचले.
चोरट्यांजवळ सापडली तीन मंगळसूत्रे
पोलिसांनी दोन्ही संशयितांची झडती घेतली तेव्हा त्यांच्याजवळ तीन मंगळसूत्रे आढळली. यापैकी एक देवडीकर यांचे होते. उर्वरित दोन मंगळसूत्रे त्यांनी कुठे लुटली, याचा तपास पोलिसांनी सुरू केला.