९६ दिवसांनंतर मकबऱ्याचे दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:02 AM2021-06-17T04:02:26+5:302021-06-17T04:02:26+5:30

औरंगाबाद : जनजीवन पुन्हा सुरळीत सुरू झाले असून, बुधवारपासून पर्यटनस्थळही अनलॉक करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. यामुळे ...

After 96 days, the tomb doors opened | ९६ दिवसांनंतर मकबऱ्याचे दरवाजे उघडले

९६ दिवसांनंतर मकबऱ्याचे दरवाजे उघडले

googlenewsNext

औरंगाबाद : जनजीवन पुन्हा सुरळीत सुरू झाले असून, बुधवारपासून पर्यटनस्थळही अनलॉक करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. यामुळे तब्बल ९६ दिवसांनंतर बीबी का मकबऱ्याचे दरवाजे बुधवारी उघडले. शहरातील ५०० हौशी नागरिकांनी या संधीचा फायदा उचलत मकबऱ्याला भेट देत बराच वेळ या ऐतिहासिक वास्तूत घालविला.

अनलॉकनंतर बुधवारी बीबी का मकबरा उघडला; पण पाणचक्की, छत्रपती शिवाजी महाराज पुराण वस्तुसंग्रहालय मात्र पर्यटकांसाठी बंदच होते.

पर्यटनस्थळ अनलॉक होणे हे पर्यटनाच्या राजधानीच्या अर्थकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय होय. कारण, येथे जागतिक वारसा अजिंठा, वेरूळ लेणी, दौलताबादचा किल्ला, दख्खन का ताज बीबी का मकबरा, पाणचक्की, औरंगाबाद लेणी व धार्मिक तीर्थक्षेत्रांमुळे दरवर्षी हजारो देशी-विदेशी पर्यटक येथे येत असतात. त्यावर हॉटेल उद्योग, ट्रॅव्हल्स एजन्सी, रेस्टारंट, पैठणी उद्योग, लहान- मोठे व्यावसायिक, असा हजारो लोकांचा रोजगार अवलंबून आहे.

यामुळे पर्यटनस्थळ सुरू झाल्याने या उद्योगातील लोकांनी निर्णयाचे स्वागत केले. शहरातील फक्त बीबी का मकबरा बुधवारी पर्यटकांसाठी उघडण्यात आला होता. सुरक्षा रक्षक व पुरातत्व विभागातील कर्मचाऱ्यांनी सकाळी मकबऱ्याचा दरवाजा उघडला. कर्मचाऱ्यांनी साफसफाईला सुरुवात केली. तोपर्यंत १० वाजून गेले होते. दिवसभरात विदेशातील एकाच पर्यटकाने मकबऱ्याला भेट दिली. बाहेरगावाहून शहरातील नातेवाइकांना भेटण्यासाठी आलेली काही कुटुंबे होती. त्यांनी पर्यटनस्थळ सुरू झाल्याचा संधीचे सोने करीत मकबरा पाहिला, तसेच शहरातील काही जण कुटुंबीयांसह येत होते. दुपारी उन्हाचा पारा वाढल्याने संख्या रोडावली होती; पण सायंकाळी काही जण हौशीने सहपरिवार मकबऱ्यात आले होते. शुक्रवार ते रविवार या काळात मकबऱ्याला भेट देणाऱ्यांची संख्या वाढेल, असे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

चौकट

माहेरवाशिणी रमल्या मकबऱ्यात

उस्मानपुरा येथील इंदिरा गांधी मराठी कन्या विद्यालयातील काही माजी विद्यार्थिनी लग्न झाल्यानंतर वेगवेगळ्या शहरांत स्थलांतरित झाल्या. मात्र, या सगळ्या जणी सध्या शहरात आपल्या माहेरी आल्या आहेत. त्या एकमेकींशी संवाद साधत मकबऱ्यात भेटल्या. त्यांनी बराच वेळ तेथे व्यतीत केला. स्वाती म्हस्के, भाग्यशाली त्रिभुवन, सोनाली मुसळेसह अन्य मैत्रिणींनी सेल्फी काढत आनंद व्यक्त केला.

चौकट

नागरिकांची निराशा

देवळाई येथील रहिवासी अल्ताफ शेख हे आपल्या आईला घेऊन मकबऱ्यात आले होते. त्यांनी सांगितले की, मकबऱ्यातील मुख्य कबर, तिच्या भोवतीचा परिसर देखभाल, दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवला आहे. यामुळे कबरीचे दर्शन घेता आले नाही. नाराजी व्यक्त करणारी अशी काही कुटुंबेही आमच्या प्रतिनिधीला भेटली.

चौकट

उद्यापासून सुरू होणार पुराण वस्तुसंग्रहालय

वक्फ बोर्डाच्या आधिपत्याखाली असलेली पाणचक्की उघडण्याची परवानगी बुधवारी देण्यात आली नाही. यामुळे नागरिक पाणचक्कीच्या गेटजवळ चौकशी करून पुढे मकबऱ्याकडे जात होते. मनपाच्या अखत्यारीत येणारे छत्रपती शिवाजी महाराज पुराण वस्तुसंग्रहालय शुक्रवारपासून सुरू होणार असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. औरंगाबाद लेणीला भेट देणाऱ्यांची संख्याही अत्यल्प होती.

चौकट

औरंगाबादमध्ये पर्यटन हंगाम ऑक्टोबर ते मार्च हा ६ महिन्यांचा असतो. आता पर्यटन खुले झाले, तर पर्यटक ऑक्टोबरच्या पुढील महिन्यात पर्यटनाला येण्याचे नियोजन करतात. याचा फायदा येथील पर्यटन उद्योगाला होईल.

-जसवंतसिंग राजपूत,

अध्यक्ष, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन

Web Title: After 96 days, the tomb doors opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.