विनाकागद वाटले कर्ज, 'आदर्श' पाठोपाठ आता देवाई महिला सहकारी संस्थेत २२ कोटींचा घोटाळा

By सुमित डोळे | Published: September 30, 2023 03:50 PM2023-09-30T15:50:29+5:302023-09-30T16:28:01+5:30

संचालक पती-पत्नी पसार; सातारा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल

After Adarsh Credit society, now 22 Crore scam in Dewai Mahila Civic Cooperative Society | विनाकागद वाटले कर्ज, 'आदर्श' पाठोपाठ आता देवाई महिला सहकारी संस्थेत २२ कोटींचा घोटाळा

विनाकागद वाटले कर्ज, 'आदर्श' पाठोपाठ आता देवाई महिला सहकारी संस्थेत २२ कोटींचा घोटाळा

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचा कोटींचा घोटाळा गाजत असतानाच शहरातील देवाई महिला नागरी सहकारी पतसंस्थेत २२ कोटींचा घोटाळा करून अध्यक्ष मीना महादेव काकडे व कार्यकारी संचालक महादेव अच्युतराव काकडे हे पसार झाले आहेत. नियमाप्रमाणे समिती सदस्य व पदाधिकाऱ्यांची निवड करणे बंधनकारक असताना दोघांनीच कारभार पाहून नातेवाइकांच्या नावे कर्ज उचलून स्वत:च रक्कम उकळली. शुक्रवारी सातारा पोलिस ठाण्यात त्यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

सहकारी संस्थेचे लेखापरीक्षक दत्तात्रय धुमाळ यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. २०१८ ते २०२३ मध्ये संस्थेच्या समितीची निवडणूक झाली. मात्र, तरीही समितीचे अध्यक्ष व सचिवांनी राजीनामा दिला. त्यामुळे इतर सदस्यांनी जून, २०२१ मध्ये मीना काकडे यांची अध्यक्षपदी निवड केली. मीना यांनी पुढे पती महादेवलाच कार्यकारी संचालक केले. मात्र, उर्वरित समिती सदस्य व पदाधिकारी नियुक्त केलेच नाही. कुठलीही कागदपत्रे, पडताळणी न करता कर्जाची खिरापत वाटत गेले. त्याच्या वसुलीसाठी कुठलेही प्रयत्न केले नाही. अन्य बँकेत ८ कोटींची संस्थेची गुंतवणूक दाखवून ती देखील परस्पर हडप केली.

यांच्या नावे कर्ज, पण एकही कागद नाही
पती-पत्नीने मिळून के. एम. के. ट्रेडिंगच्या, देवाई मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्स, अप्पासाहेब प्रल्हाद चव्हाण यांच्या नावे बनावट कागदपत्रांच्या आधारे विनातारण १३ कोटी ८३ लाख ८९ हजारांचे कर्ज उचलले. तसेच ३१ मार्च २०२३ रोजी के. एम. के. प्रा. लि. नावे २ कोटी १० लाख व १ कोटीचे दोन कर्ज घेऊन रक्कम काढून घेतली. या कर्जासाठीचे अर्जही अर्धवट लिहिलेले आढळले. निरीक्षक अशोक गिरी यांनी याप्रकरणी धुमाळ यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. अधिक तपासासाठी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे गिरी यांनी सांगितले.

Web Title: After Adarsh Credit society, now 22 Crore scam in Dewai Mahila Civic Cooperative Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.