आदित्य यांच्यापाठोपाठ उद्धव ठाकरे मनपा प्रशासकांच्या निवासस्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:06 AM2021-02-06T04:06:36+5:302021-02-06T04:06:36+5:30
औरंगाबाद : महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय आणि त्यांच्या पत्नी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या दिल्लीगेट येथील ‘जलश्री’ या निवासस्थानावर ...
औरंगाबाद : महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय आणि त्यांच्या पत्नी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या दिल्लीगेट येथील ‘जलश्री’ या निवासस्थानावर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यापाठोपाठ शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही भेट दिली. महापालिकेच्या इतिहासात मुख्यमंत्री प्रशासकांच्या निवासस्थानावर येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
उद्धव ठाकरे औरंगाबाद शहरात दुपारी बारा वाजता दाखल झाले. शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेतील जलकुंभाच्या कामाची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीगेट येथील महापालिका कर्मचारी निवासस्थानासमोर जलकुंभांची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. गळ्यात इन्फेक्शन असल्यामुळे त्यांना बोलण्यासाठी त्रास होत होता. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलणे त्यांनी टाळले. अवघ्या पाच मिनिटांत पाहणी करून मुख्यमंत्री थेट ‘जलश्री’ या मनपा प्रशासकांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचले. मुख्यमंत्र्यांनी प्रशासकांच्या निवासस्थानी भेट दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मुख्यमंत्री दहा मिनिटे ‘जलश्री’मध्ये होते. या भेटीसंदर्भात पाण्डेय यांनी ही कौटुंबिक आणि खाजगी भेट असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री ‘जलश्री’वर चहापानासाठी गेले असल्याचे सांगण्यात आले. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी तिथे चहापान केले नाही. गळ्याचा त्रास असल्याने कदाचित त्यांनी चहा टाळला असावा. यावेळी ठाकरे यांनी पाण्डेय यांचे ७ वर्षीय चिरंजीव देवमान याच्यासोबत हितगुज केले. त्यानंतर मुख्यमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीसाठी रवाना झाले.
चौकट...
आतापर्यंत ४० आयुक्त
१९८२ मध्ये महापालिका अस्तित्वात आली, तेव्हापासून आजपर्यंत जवळपास ४० पेक्षा अधिक आयुक्त आणि प्रशासकांनी औरंगाबादमध्ये काम पाहिले. मात्र, आजपर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या ‘जलश्री’ या निवासस्थानावर भेट दिली नव्हती, हे विशेष.
१६ जानेवारी रोजी आदित्य ठाकरे
शहरातील कचरा प्रक्रिया प्रकल्पांचे लोकार्पण १६ जानेवारी रोजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या दौऱ्याप्रसंगी आदित्य ठाकरे यांनी महापालिका प्रशासक पाण्डेय यांच्या जलश्री निवासस्थानाला भेट दिली होती.
पिता-पुत्राच्या भेटीमुळे चर्चा
आदित्य ठाकरे यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पाण्डेय यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने पाण्डेय यांचे मुख्यमंत्री दरबारी चांगलेच वजन असल्याचीही चर्चा राजकीय आणि अधिकारी वर्तुळात रंगली आहे.