अखेर पीडब्ल्यूडीने विभागात नेमले अभियंते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2017 12:53 AM2017-07-17T00:53:15+5:302017-07-17T00:59:36+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे सात विभाग कार्यकारी अभियंत्यांविना वाऱ्यावर असल्यासारखे होते
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मराठवाड्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे सात विभाग कार्यकारी अभियंत्यांविना वाऱ्यावर असल्यासारखे होते. त्या सर्व विभागांना कार्यकारी अभियंते नियुक्त करण्यासाठी शासनाने मराठवाड्यासह राज्यात १८ अभियंत्यांच्या बदल्या केल्या आहेत. जिल्हा परिषदेतील अभियंते विभागाने बदलले असून, तेथील जागा सध्या तरी रिक्त आहेत. यामुळे कहीं खुशी तर कहीं गम, अशी परिस्थिती विभागात निर्माण
झाली आहे.
४ जुलैच्या अंकात लोकमतने ‘मराठवाड्यात पीडब्ल्यूडी वाऱ्यावर’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून बांधकाम खात्याला जागे केले. त्याचा परिणाम दोन दिवसांपूर्वी विभागात थोड्याफार प्रमाणात अभियंते नेमण्याची तसदी विभागाने घेतली. बदल्यांपूर्वी प्रभारी अभियंत्यांवर मराठवाड्याची जबाबदारी देण्यात आल्यामुळे नवीन कामांना मुहूर्त लागत नव्हता, तर जुन्या कामांची बिले निकाली निघत नसल्यामुळे सगळी यंत्रणा कोलमडल्यासारखी झाल्याने मुख्य अभियंत्यांपासून सचिव, बांधकाममंत्र्यांपर्यंत तक्रारी
गेल्या होत्या.
एवढे होऊनही विभागातील जालना, हिंगोली जि.प.मधील रिक्त जागा भरल्या गेल्या नाहीत. तसेच अंबाजोगाई, लातूरमध्येही कार्यकारी अभियंते नियुक्त करण्यात आले नाहीत. अहमदनगर, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, भंडारा, वाशिम आदी जिल्ह्यांतही बदल्या करण्यात आल्या.
औरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद मुख्य सर्कलअंतर्गत २७ कार्यकारी अभियंत्यांची पदे आहेत. यामध्ये तीन अधीक्षक अभियंता आणि एक दक्षता व गुणनियंत्रण मंडळाचा समावेश आहे. विभागात तीन सा.बां.च्या तीन प्रयोगशाळा आहेत.
औरंगाबादसह जालना जिल्ह्याचे एक सर्कल असून, यात ५ अभियंते औरंगाबादला, तर ३ जालन्यासाठी आहेत. नांदेडसह परभणी, हिंगोली, भोकर, नांदेड मार्ग प्रकल्प, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, हिंगोली, परभणी जि.प., उस्मानाबादमध्ये सर्कलसह लातूर, निलंगा, अंबाजोगाई, बीड, उस्मानाबाद, लातूर व उस्मानाबाद जि.प., बीड जि.प. सेक्शनचा समावेश आहे.