खैरेच काय, मी कोणालाही घाबरत नाही; अंबादास दानवेंचे प्रत्युत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 01:14 PM2021-03-20T13:14:54+5:302021-03-20T13:16:23+5:30
Shivsena Leader Chandrakant Khaire Vs Ambadas Danwey औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवरून खैरे आणि आ. दानवे यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
औरंगाबाद : खैरेच काय, मी कोणालाही घाबरत नाही, अशा शब्दांत आ. अंबादास दानवे यांनी शुक्रवारी माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना प्रत्युत्तर दिले. काल खैरे यांनी कोण अंबादास दानवे, मी त्याचे नाव घेऊन त्याला मोठं करीत नाही, असे विधान केले होते.
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवरून खैरे आणि आ. दानवे यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. खैरे हे माझे ज्येष्ठ नेते आहेत, मार्गदर्शक आहेत, एवढेच मी बोलू शकतो, अशी सुरुवात करून आ. दानवे यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
खैरे यांनी आतापर्यंत माझ्याविरुद्ध वरिष्ठांकडे पंचवीस तक्रारी केलेल्या आहेत; मी मात्र एकही तक्रार केलेली नाही, असे आ. दानवे म्हणाले. आपण खैरे यांना घाबरता का, असे विचारले असता दानवे उत्तरले, खैरेच काय, मी कोणालाही घाबरत नाही. आपणास खैरे अजून कळलेले नाहीत काय, असे विचारता दानवे म्हणाले, खैरे कळण्यापेक्षा शिवसेना कळणे महत्त्वाचे आहे. काही जणांना पक्षशिस्त कळत नाही, असे खैरे म्हणतात, याकडे लक्ष वेधले असता आ. दानवे उत्तरले, पत्रकारांकडे जाऊन तक्रार करणे ही पक्षाची शिस्त आहे का, यापेक्षा त्यांनी एक फोन करून मला बोलावले असते तर मी त्यांच्याकडे गेलो असतो.
बँकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढवायला हवी होती. उद्धव ठाकरे यांना छळणाऱ्या भाजपबरोबर जाण्याची गरज नव्हती, असे खैरे म्हणतात याकडे लक्ष वेधले असता आ. दानवे म्हणाले, सहकाराच्या निवडणुकीत मी नवा आहे. मात्र संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार यांच्यासारखे ज्येष्ठ नेते वर्षानुवर्षे बँकेचे संचालक आहेत. आता यावेळीही सात उमेदवार शिवसेनेचे पदाधिकारी शेतकरी विकास पॅनलमध्ये आहेत. सहकारात पक्ष नसतोच.