अखेर मराठवाड्यावर मान्सूनची मेहेरबानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 01:30 PM2019-06-25T13:30:37+5:302019-06-25T13:41:22+5:30
मराठवाड्यात सर्वांनाच मुसळधार पावसाची अपेक्षा आहे.
औरंगाबाद : मृग नक्षत्राने दगा दिला असला तरी आर्द्राने मराठवाड्यावर बऱ्यापैकी कृपादृष्टी केली आहे. गेल्या २४ तासांत बीड जिल्ह्यात तीन तर उस्मानाबाद जिल्ह्यात दोन मंडळांत अतिवृष्टी झाली. नांदेड व लातूर जिल्ह्यातही वरुणराजाने दमदार हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून, पेरण्यांना वेग आला आहे. मात्र, मराठवाड्याचा औरंगाबादसह बराच भाग अजूनही तहानलेलाच आहे. सर्वांनाच मुसळधार पावसाची अपेक्षा आहे.
परभणी जिल्ह्यात पाऊस; शेतकरी लागले कामाला
परभणी जिल्ह्यात सोमवारी सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. मध्यम स्वरूपाच्या या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. परभणी शहर व परिसरात सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. एक तास झालेल्या पावसाने नागरिकांना उकाड्यापासूून दिलासा मिळाला. तसेच सोनपेठ तालुक्यात २० मिनिटे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पूर्णा तालुक्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तालुक्यातील कात्नेश्वर, नांदगाव, झिरोफाटा, एरंडेश्वर या मंडळामध्ये पाऊस झाला. सोमवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ६.३३ मि.मी. पाऊस झाला. रविवारी रात्री सेलू तालुक्यात सर्वाधिक २१ मि.मी. तर मानवत तालुक्यात १६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत.
बीड जिल्ह्यात तीन मंडळात अतिवृष्टीची नोंद
शनिवारी पहाटे आणि रविवारी रात्रीपासून सोमवारी दुपारपर्यंत जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. केज तालुक्यातील केज मंडळात ६७ मिमी, हरिश्चंद्र पिंपरी मंडळात ६५ मिमी तर होळ मंडळात ६८ मिमी पावसाची अतिवृष्टी म्हणून नोंद झाली आहे. जिल्ह्यात सोमवारी सकाळी ९ वाजेपर्यंत मागील २४ तासात एकूण १८६.४ मिमी पाऊस झाला. ज्याची सरासरी १६.९ मिमी आहे. यंदा पावसाने २० दिवस ओढ दिल्याने चिंतेचे वातावरण होते. शुक्रवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली. शनिवारी पाटोदा, आष्टी तर रविवारी बीड, पाटोदा, आष्टी केज, गेवराई, शिरूर कासार तालुक्यात चांगला पाऊस झाला. सोमवारी सकाळपर्यंत बीड तालुक्यात २५.४, पाटोदा २९.५, आष्टी २३.६, गेवराईत १६.६, शिरुर तालुक्यात १८.७, वडवणीत २, अंबाजोगाईत ३.२, माजलगाव १३.९, केजमध्ये ३७, धारुर तालुक्यात १६.७ मिमी पावसाची नोंद झाली. ज्याची सरासरी १६.९ इतकी आहे.
लातूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस
लातूर शहरासह जिल्ह्यात सोमवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली. रेणापूर, चाकूर, अहमदपूर, जळकोट, निलंगा, देवणी, औसा, लातूर तालुक्यांत अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे. यामुळे बळीराजा सुखावला असून, मोठ्या पावसाची प्रतीक्षा अद्यापही कायम आहे. जळकोट तालुक्यातही मोठा पाऊस झाला असून, आठवडी बाजारात व्यापाऱ्यांची या पावसाने तारांबळ उडाली. जवळपास एक तास पावसाने झोडपले. लातूर शहर व परिसरातही १५ ते २० मिनिटे पावसाने हजेरी लावली. किल्लारी आणि औराद शहाजानी वगळता सर्वत्र पाऊस झाला.
नांदेडमध्ये दमदार पाऊस
मागील महिनाभरापासून जिल्हावासीयांना असणारी पावसाची प्रतीक्षा संपली आहे. रविवारी रात्री नांदेड शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत पावसाचे दमदार आगमन झाले. सर्वदूर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे.रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. रात्री दहाच्या सुमारास शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर हा पाऊस कोसळत होता. याच वेळी भोकर, उमरी, अर्धापूर आणि मुदखेड परिसरातही जोराचा पाऊस झाला. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ११.६३ मिमी पावसाची नोंद झाली असून नांदेड तालुक्यात ३८ मिमी, भोकर ३६, उमरी २८, अर्धापूर १७.३३, मुदखेड २७.६७, हदगाव ९.८६, हिमायतनगर ४.६७, किनवट ७.५७, बिलोली ३, नायगाव ३.२०, मुखेड ४.२९ तर लोहा तालुक्यात ७.५७, देगलूर १.८३ आणि माहूर तालुक्यात २ मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे नांदेड शहरातील सिडको, असर्जन परिसरासह विविध ठिकाणचा विद्युत पुरवठा रविवारी रात्री खंडित झाला होता. सोमवारीही जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस झाला. दिवसभर ढगाळ वातावरण होते.
हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी पाऊस
हिंगोली जिल्ह्यात २४ जून रोजी विविध ठिकाणी पाऊस झाला. सकाळपासूनच सर्वत्र ढगाळ वातावरण होते. अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला तर काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. हिंगोली शहरात सकाळी ११.३० वाजता हलक्या सरी बरसल्या. जवळपास अर्धातास पाऊस झाला. तर वसमत येथे जवळपास एक तास जोरदार पावसाने हजेरी लावली. वसमत तालुक्यातील हट्टा व कौठा परिसरातही दमदार पाऊस झाला. सेनगाव परिसरात रिमझीम पाऊस झाला. औंढा नागनाथ येथे हलक्या सरी बरसल्या. तसेच कनेरगावनाका, सवना, बासंबा व कळमनुरी, नांदापूर या ठिकाणी पाऊस झाला. काही भागात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. अनेक ठिकाणी पेरणीची कामे सुरू असल्याचे चित्र सोमवारी दिसून आले.
जालना जिल्ह्यात ६ मि.मी. पाऊस
मागील दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ६.६६ मिमी पाऊस झाला असून, सर्वाधिक भोकरदन तालुक्यात २६ मिमी पाऊस झाला. भोकरदन व परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नदी-नाले तुडुंब वाहू लागले असून, रायघोळ नदीला पूर आला होता. तर जुई, धामणा धरणात पाण्याची आवाक होऊ लागली आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ३५.४ मिमी म्हणजे ५.९ टक्के पाऊस झाला आहे. यात जालना तालुक्यात ३.२ टक्के, बदनापूर ४.२०, भोकरदन ९.६२, जाफ्राबाद ३.९, परतूर ६.७२, मंठा ५.२६, अंबड ३.४६ तर घनसावंगी तालुक्यात एकूण ५.१७ टक्के पाऊस झाला आहे.
उस्मानाबादला दोन मंडळांत अतिवृष्टी
उस्मानाबाद जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागात पावसाने हजेरी लावली आहे़ रविवारी रात्री व सोमवारच्या पहाटे, दुपारीही ठिकठिकाणी पाऊस झाला़ यात सर्वाधिक पाऊस हा वाशी व जळकोट मंडळात नोंदला गेला आहे़ वाशी येथे झालेल्या पावसाची नोंद ११४ मिलीमीटर दतकी आहे़ तर तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथेही ७५ मिलीमीटर पाऊस झाला आहे़ दरम्यान, सोमवारी दुपारी उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळा, खेड परिसरातही जोरदार पाऊस झाला़ या पावसामुळे शेतात पाणी साचले आहे़