आंतरजातीय प्रेमविवाह केल्यानंतर मुलगी होताच पत्नीस सोडले
By राम शिनगारे | Published: May 3, 2023 07:38 PM2023-05-03T19:38:40+5:302023-05-03T19:39:04+5:30
पतीसह सासरच्या सदस्यांकडून छळ; क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : प्रेमसंबंधातुन आंतरजातीय विवाह केलेल्या तरुणीस वर्षभरानंतर मुलगी होताच माहेरी सोडून देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह कौटुंबिक छळाचा गुन्हा पतीसह सासरच्या लोकांच्या विरोधात नोंदविण्यात आला.
आरोपींमध्ये पती अमेयकुमार नितीनचंद्र पाटील, सासरा नितीनचंद्र रामचंद्र पाटील यांच्यासह दोन महिलसांचा समावेश आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार प्रेमसंबंधानंतर अमेयकुमार याच्यासोबत २४ मे २०२१ रोजी नोंदणी पद्धतीने विवाह केला. पीडिता अनुसूचित जातीतील असल्यामुळे अमेयकुमारच्या कुटुंबांनी लग्नानंतर त्यांना घरात घेण्यास नकार दिला. त्यामुळे दोघे पती-पत्नी पीडितेच्या आईच्या घरी राहू लागले. तीन महिन्यानंतर अमेयकुमारच्या वडिलांनी घरी येत शेजारीच खाेली करून देण्यास सांगितले. त्यानुसार अमेयकुमार पत्नीला घेऊन वडिलांच्या शेजारी राहण्यास गेला. त्याठिकाणी पीडितेला दिवस गेले. त्याची माहिती सासरच्यांना झाल्यानंतर त्यांनी गर्भपात करण्यासाठी पीडितेवर दबाव आणू लागले.
दरम्यान, २७ फेब्रुवारी २०२२ रोजी पीडितेला बेदम मारहाण करण्यात आली. तरीही पीडितेने गर्भपात करण्यास नकार दिला. त्यानंतरही पीडितेचा पती, सासरा, सासु आणि नणंद सतत छळ करू लागले. राहण्यासाठी घेतलेला फ्लॅट खाली करण्यास भाग पाडले. घरातील सर्व सामान घेऊन गेले. पतीही त्याच्या आई-वडिलांसोबत निघून गेला. त्यानंतर पीडितेने भरोसा सेलकडे तक्रार नोंदवली. त्याठिकाणी झालेल्या समुपदेशनात सासरच्यांनी पीडितेला नांदवणार नाहीत, असे लेखी लिहुन दिले. पीडितेने १६ जुन २०२२ रोजी एका मुलीला जन्म दिला. मुलगी झाल्याची माहिती सासरच्यांना झाल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त करीत पुन्हा नांदवायला नेण्यास नकार दिला. शेवटी पीडितेने क्रांतीचौक पोलिस ठाणे गाठून चौघांच्या विरोधात गुन्हा नोंदवला. अधिक तपास सहायक पोलिस आयुक्त अशोक थोरात करीत आहेत.
बाळाला देण्यासाठी दबाव
आरोपी पती अमेयकुमार याने पत्नीकडे आठ महिन्यांपूर्वी जन्मलेल्या मुलीचा ताबा स्वत:कडे घेण्यासाठी पत्नीवर दबाव आणला होता. मुलीची प्रकृती बिघडली होती. त्याची माहिती पीडितेने पतीला दिल्यानंतर मुलीला माझ्या ताब्यात दे. तीचे सर्व मी बघून घेतो, असे म्हणत शिवीगाळ केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.