आश्वासनानंतर सुटले आमदारांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:05 AM2017-11-28T00:05:55+5:302017-11-28T00:06:07+5:30
जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी वारंवार निवेदने देऊनही काहीच फरक पडत नसल्याने आ. संतोष टारफे व आ. रामराव वडकुते यांनी २७ नोव्हेंबर रोजी जिल्हा कचेरीसमोर उपोषण सुरु केलेले उपोषण पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आश्वासनानंतर सोडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी वारंवार निवेदने देऊनही काहीच फरक पडत नसल्याने आ. संतोष टारफे व आ. रामराव वडकुते यांनी २७ नोव्हेंबर रोजी जिल्हा कचेरीसमोर उपोषण सुरु केलेले उपोषण पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आश्वासनानंतर सोडले. मात्र अवैध दारू विक्रीवरून महिलांना उत्पादन शुल्क व पोलिसांना चांगलेच धारेवर धरल्याचे पहायला मिळाले.
हिंगोली जिल्ह्यात मटका व जुगार अड्डे जोरात सुरु आहेत. यासोबतच दारु, गुटख्याची अवैध विक्री होत आहे. यात तरुणाई व्यसनाधिनतेत अडकत असून मटका व जुगारामुळे आर्थिक खाईत ढकलली जात आहे, असा आमदारांचा आरोप आहे. तर यादी देवूनही पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, सकाळी पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी दोन्ही आमदारांची भेट घेतली. मात्र दोघेही उपोषणावर ठाम राहिले. म. गांधी यांच्या पुतळ्यास हार अर्पण करुन ११ वाजता जिल्हा कचेरीसमोर उपोषण सुरु केले आहे. उपोषणाच्या ठिकाणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, जि. प. उपाध्यक्ष अनिल पतंगे, अॅड. बाबा नाईक, माधव कोरडे, संजय दराडे, विनायक देशमुख, डॉ. सतीश पाचपुते, मनीष आखरे, जगजीतराज खुराणा, शेख निहाल, जितसिंह साहू, रमेश जाधव, बिरजू यादव, अनिल नैनवाणी, गोपाल दुबे, कैलास सोळुंके, माबूद बागवान, श्यामराव जगताप, शशिकांत वडकुते, नामदेव राठोड, कैलास देशमुख, बापूराव घोंगडे, विनोद नाईक, बालाजी घुगे, रवी कावरखे, सुमित्रा टाले आदी काँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते. तर उपोषणस्थळी अवैध देशी दारू, गुटखा, मटक्याचे फलक लावले होते. या उपोषणाच्या ठिकाणी आ.तान्हाजी मुटकुळे यांनीही भेट दिली. तर अवैध व्यवसाय बंद होणे गरजेचे असल्याचे त्यांनीही सांगितले. यात पूर्वी पोलीस अधिकाºयांचा असलेला वचक आता कमी झाला आहे. पुन्हा परिस्थिती पूर्वपदावर आली पाहिजे, असे बजावले. यावेळी पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी उपोषणकर्त्यांना येत्या २४ तासांत अवैध धंद्यांविरुद्ध आणखी कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तर कसूर करणाºया अधिकाºयांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले.
संतोष बांगर यांचीही भेट
या उपोषणस्थळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनीही भेट देत उपोषणाला पाठिंबा दिला. त्यामुळे हा सर्वत्र चर्चेचा विषय झाला होता.
डीपींचाही प्रश्न
आमदारांनी अवैध धंद्यांविरुद्ध उपोषण सुरू केल्याचे निमित्त साधून शेतकºयांनी महावितरणच्या अधिकाºयांनाही बोलवायला सांगितले. त्यांनाही पाचारण केले. त्यानंतर पुन्हा एकदा डीपींचे प्रकरण गाजले. तर आॅईलची समस्याही मांडण्यात आली. नियमानुसार प्रतीक्षा यादीतील शेतकºयांनाच डीपी देण्यास पुन्हा एकदा बजावण्यात आले.