ऑडिटनंतर खासगी हॉस्पिटल्सनी २७ लाख परत केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:05 AM2021-06-09T04:05:53+5:302021-06-09T04:05:53+5:30
विकास राऊत औरंगाबाद : शहरातील खासगी हॉस्पिटल्सने कोरोना महामारीच्या आपत्तीला इष्टापत्ती समजून रुग्णांची लूट सुरू केल्याच्या तक्रारी वाढू लागल्यानंतर ...
विकास राऊत
औरंगाबाद : शहरातील खासगी हॉस्पिटल्सने कोरोना महामारीच्या आपत्तीला इष्टापत्ती समजून रुग्णांची लूट सुरू केल्याच्या तक्रारी वाढू लागल्यानंतर एप्रिल ते आजवर रुग्णांकडून जास्तीचे बिल आकारल्याने २८ हॉस्पिटल्सना सुमारे ७५ लाख रुपये जास्तीचे बिल घेतल्याच्या नोटिसा जिल्हा प्रशासनाने बजावल्या. त्यातील २७ लाख रुपये प्रशासनाने वसूल करून रुग्णांना दिले आहेत. २८ पैकी १० हॉस्पिटल्सने रक्कम परत केली. ४ हॉस्पिटल्सवर कारवाईचा प्रस्ताव आहे. १० हॉस्पिटल्सने रक्कम परत करण्याची तयारी दर्शविली आहे.
गेल्या पंधरवड्यात १४ खासगी रुग्णालयांनी कोरोना उपचारासाठी वैद्यकीय देयकांमध्ये ४४ लाख ७७ हजार १३१ रुपये इतकी ज्यादा रकमेची आकारणी केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. यातील काही हॉस्पिटल्सने रक्कम रुग्णांना परत केली आहे, काहींनी १० दिवसांची मुदत मागितली आहे. ४ हॉस्पिटल्सने काहीही प्रतिसाद दिलेला नाही, त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासकांकडे दिला आहे. रेकॉर्डवर असलेल्या तक्रारी वगळता ऑडिटर्सने फोनवरून सुमारे ५९ लाख रुपयांचे कन्सेशन बिलांमध्ये संबंधित रुग्णांना मिळवून दिले आहे.
७८ हॉस्पिटल्ससाठी ४९ ऑडिटर
शहरातील ७८ कोविड हॉस्पिटल्ससाठी विविध विभागांतील ४९ ऑडिटरची टीम स्थापन केलेली आहे. दैनंदिन बिल तपासणे, तक्रारीनुसार बिलांची उलटतपासणी करून हॉस्पिटल्सला नोटीस देण्यात आहे. दोन महिन्यांत १० हॉस्पिटल्सकडून २७ लाख रुपये वसूल करून रुग्णांना परत केले आहेत. धूत आणि हेडगेवार हॉस्पिटलने न्यायालयात धाव घेतली आहे, तर ४ हॉस्पिटल्सवर कारवाईच्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले.
१४ हॉस्पिटल्सना दिल्या नोटिसा
कृष्णा हॉस्पिटलने ३० लाख ८७ हजार ५०० रुपयांचे जास्तीचे बिल आकारले आहे. ग्लोबल इंटरनॅशनल हॉस्पिटलने ३ लाख ९९ हजार, धूत हॉस्पिटलने ६ लाख ८८ हजार १८३ रुपये, हेडगेवार हॉस्पिटलने २९ हजार ६४ रुपये, सुमनांजली हॉस्पिटल ८११३, आशिष हॉस्पिटल ७० हजार ४००, धनवई हॉस्पिटल १२२००, मेडिकव्हर हॉस्पिटल ४९ हजार २७१, सनशाईन हॉस्पिटल ५६ हजार ५००, ओरियन सिटी केअर हॉस्पिटल ३९ हजार ४००, ईश्वर हॉस्पिटल १६ हजार, एशियन हॉस्पिटल ५९००, अजंठा हॉस्पिटल ११ हजार, वायएसके हॉस्पिटलने ४६०० रुपये जास्तीचे बिल कोरोना रुग्णांकडून घेतले आहे.
जिल्हाधिकारी म्हणाले, कुणालाही सोडणार नाही
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात २७ लाख रुपयांची अतिरिक्त बिलांची वसुली करून ती रुग्णांना परत केली आहे. आता १४ हॉस्पिटल्सना आगाऊ बिल घेतल्यामुळे नोटिसा दिल्या आहेत. ज्यांनी जास्तीचे बिल आकारले, त्यांना सोडणार नाही. या महामारीचा कुणीही गैरफायदा घेऊ नये, सामान्यांची लूट कुणी करीत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही.
कोरोना रुग्णांवर उपचार करणारे हॉस्पिटल्स - ७८
किती ऑडिटर नेमले आहेत - ४९
बिल जास्त घेतल्याच्या तक्रारी - १८ तक्रारी रेकॉर्डवर
ऑन दी स्पॉट बिलात कपात - ५९ लाख रुपये