रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच मनोज जरांगे पाटील दौऱ्यावर
By बापू सोळुंके | Published: November 12, 2023 02:04 PM2023-11-12T14:04:14+5:302023-11-12T14:04:54+5:30
फटाके फोडून आणि एक मराठा लाख मराठा घोषणांनी केले उत्स्फुर्त स्वागत
बापू सोळुंके, छत्रपती संभाजीनगर: ४० दिवसाच्या खंडानंतर तब्बल नऊ दिवसांच्या उपोषणाने प्रकृती खालवल्याने २ नोव्हेंबरपासून शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेले मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांना आज १२ नोव्हेंबर रोजी सुटी देण्यात आली. मागील दहा दिवस डॉक्टरांनी केलेल्या उपचाराला त्यांचे वजन ८ किलो वाढले यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जरांगे पाटील रुग्णालयातून बाहेर येताच कार्यकर्त्यांनी फटक्याची आतिषबाजी करीत आणि एक मराठा, लाख मराठा च्या घोषणा देत त्यांचे स्वागत केले.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील चार महिन्यापासून सतत आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे मागील दहा दिवसांपूासन शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल होते. उपोषणामुळे त्यांचे वजन दहा किलो घटले होते. शिवाय प्रचंड अशक्तपणा होता. यापार्श्वभूमीवर राज्यसरकारने त्यांना मुंबईला उपचारासाठी नेण्याचा निर्णय घेतला होता.मात्र जरांगे यांनी मुंबई ऐवजी छत्रपती संभाजीनगरमधील खाजगी रुग्णालयातच उपचार घेतो, असे सांगून ते दाखल झाले होते. रुग्णालयातून डिस्चार्ज होताच त्यांनी पैठण तालुक्यातील दावलवाडी आणि कचनेर येथे संपर्क दौरा केला. दावलवाडी येथे त्यांची जाहिर सभा आयोजित करण्यात आली होती. यामुळे जरांगे पाटील यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळावा,यासाठी कालपासून प्रयत्न करीत होते.
विशेष अधिवेशन घेऊन आरक्षण द्या, जरांगे यांची महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मागणी
राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी रात्री मनोज जरांगे पाटील यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी जरांगे पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राज्यसरकारने घ्यावा,हिवाळी अधिवेशनात शक्य नसेल तर २४ डिसेंबरच्या आत विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला आरक्षण द्यावे,अशी मागणी केली.