पाच वर्षे ‘रिलेशन’मध्ये राहिल्यानंतर जातीमुळे लग्नास नकार :आयटी अभियंता तरुणीची आत्महत्या
By राम शिनगारे | Published: April 7, 2024 10:53 PM2024-04-07T22:53:59+5:302024-04-07T22:54:17+5:30
प्रियकरासह त्याच्या भावाविरोधात गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : महाविद्यालयात शिक्षण घेताना मैत्रिणीच्या मानलेल्या भावासोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्री अन् नंतर प्रेमात झाले. आरोपीने ५ वर्षे लग्नाचे आमिष दाखवून वारंवार संबंध ठेवले. प्रेयसीने लग्नाचा तगादा लावल्यावर प्रियकराने ‘तू छोट्या जातीची असल्यामुळे लग्न करू शकत नाही,’ असे सांगितले. या धक्क्यामुळे खच्चीकरण झालेल्या आयटी अभियंता तरुणीने ३० मार्च रोजी विष प्राशन केले. उपचार सुरू असताना, तिचा शनिवारी मृत्यू झाला. या प्रकरणी प्रियकरासह त्याच्या भावाविरोधात बेगमपुरा पोलिसांनी अत्याचारासह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला.
पंकज गणेश रावळकर (रा.एन-२, जय भवानीनगर) व त्याचा भाऊ आशिष रावळकर अशी आरोपींची नावे आहेत. मृत तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पीडिता महाविद्यालयात आयटीचे शिक्षण घेत असताना, तिच्या मैत्रिणीचा मानलेला भाऊ पंकजसोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्री व नंतर प्रेमात झाले. तरुणीला पंकजने स्वत:ला नोकरी लागली की, लग्न करणार असल्याचे सांगितले. त्यातून त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ही बाब तरुणीने तिच्या आई-वडिलांनाही सांगितली.
या मैत्रीचा गैरफायदा घेत, पंकजने २०१९ मध्येच शहरातील विविध भागांत नेऊन तरुणीवर अत्याचार केले. दरम्यान, तरुणीला पुण्याला मोठ्या आयटी कंपनीत नोकरी लागली. पुण्यात पंकजही तिच्यासोबत फ्लॅटवर राहू लागला. त्या ठिकाणचा संपूर्ण खर्च तरुणीच देत होती. बदनामीची भीती दाखवून तो तिच्याकडून पैसेही उकळत होता. शेवटी तरुणीने पुणे सोडून छत्रपती संभाजीनगर गाठत पंकजकडे लग्नाचा तगादा लावला, तेव्हा त्याने ‘तुम्ही छोट्या जातीचे असल्यामुळे लग्न करता येणार नाही,’ असे सांगितले.
या धक्क्यामुळे तरुणी खचली. त्यातूनच तिने गावी जाऊन ३० मार्चला विष घेतले. खासगी रुग्णालयात तिचा ६ रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी तरुणीच्या वडिलांनी बेगमपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली. मात्र, घटनास्थळ सिल्लेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्यामुळे त्या ठिकाणी पोलिसांनी गुन्हा वर्ग केला आहे.