साउथची बॉलीवूडनंतर आता पॉलीटिक्सवर नजर; केसीआरची छत्रपती संभाजीनगरात ग्रँडएन्ट्री
By विकास राऊत | Published: April 24, 2023 08:12 PM2023-04-24T20:12:12+5:302023-04-24T20:13:07+5:30
गुलाबी वादळ मराठवाड्याची राजधानीत; मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांचा ६० हून अधिक वाहनांचा ताफा
छत्रपती संभाजीनगर: दाक्षिणात्य सिनेमांमध्ये हिरोची जशी वाहनांच्या लांबलचक रांगांसह धमोकदार एण्ट्री होते. तसाच काही अनुभव तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा बीआरएसचे सर्वेसर्वा के.चंद्रशेखर राव यांच्या शहरातील प्रवेशाप्रसंगी आला. तेलंगणा राज्याच्या विशेष पोलिस बंदोबस्तासह शहर पोलिसांचा ताफा, डीव्ही कारसह समर्थकांच्या वाहनांनी विमानतळपासून जालना रोडमार्गे एन-१ टाऊन सेंटरपर्यंत पुर्ण रस्ता व्यापला होता. ६० हून अधिक वाहने त्यांच्या ताफ्यात होते.
२७ एप्रिल रोजी बीआरएस पक्षाचा वर्धापनदिन आहे. तर १ मे रोजी महाराष्ट्र दिन आहे. या दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिली सभा २४ एप्रिल रोजी झाली. या सभेला मुख्य मार्गदर्शन राव यांनी केले. सभेला जाण्यापुर्वी बीआरएसचे पदाधिकारी अभय चिकटगांवर यांच्या निवासस्थानी त्यांनी चहापान घेतले. राज्यातील प्रमुख मंत्री आणि खासदार व नेत्यांसह त्याचा ताफा ६ वाजून ४० मिनिटांनी आला. ताफ्यात एक-दोन नव्हे तर ६० हून अधिक वाहने तेलंगणा आरटीओ पासिंगचे होते. हा सगळा लवाजमा पाहून दाक्षिणात्य चित्रपटातील हिरोंची जशी एण्ट्री होते, तसाच काही अनुभव परिसरातील नागरिकांनी घेतला.
बॉलीवूडनंतर आता पॉलीटिक्सवर नजर
साऊथच्या चित्रपटांनी बॉलीवूडची पुरती पाचावर धारण बसविली आहे. बाहूबली, पुष्पा, कांतारा, केजीएफ सारख्या चित्रपटांनी बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांना बॉक्स ऑफीसवर खातेही उघडू दिलेले नाही. साऊथचे चित्रपट टी.व्ही.वर देखील धुमाकूळ घालत आहेत. हे सगळे होत असतांना साऊथच्या एमआयएम या पक्षाने मागील आठ वर्षांपुर्वीच राज्याच्या राजकारणात प्रवेश केला आहे. त्यापाठोपाठ आता भारत राष्ट्र समितीने नांदेडमार्गे मराठवाड्याच्या राजधानी गुलाबी वादळ आणले. आधी चित्रपट आणि आता राजकारण टेकओव्हर करण्यात साऊथ बाजी मारणार की काय, अशी चर्चा सामान्यांमध्ये आहे.