महापौर उमेदवारीनंतर काँग्रेसमध्ये खदखद !
By Admin | Published: May 11, 2016 12:14 AM2016-05-11T00:14:42+5:302016-05-11T00:19:55+5:30
दत्ता थोरे ल्ल लातूर महापौर अख्तर शेख यांचे महापौर पद गेल्यानंतर काँग्रेसने दीपक सूळ हा नवा चेहरा महापौरपदासाठी घोषित केला. रांगडे व्यक्तिमत्त्व,
दत्ता थोरे ल्ल लातूर
महापौर अख्तर शेख यांचे महापौर पद गेल्यानंतर काँग्रेसने दीपक सूळ हा नवा चेहरा महापौरपदासाठी घोषित केला. रांगडे व्यक्तिमत्त्व, प्रशासनावर वचक राहील असा कडक स्वभाव आणि तरुण रक्त असे मिश्रण म्हणून सूळ यांना संधी मिळाली असली तरी काँग्रेस श्रेष्ठींच्या या निर्णयामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून मात्र नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे. यातील काहींनी श्रेष्ठींना आपली नाराजी बोलूनही दाखविली असून त्यांची समजूत घालण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा चालू आहे.
अख्तर शेख यांच्यानंतर महापौर कोण ? हा काँग्रेससमोर प्रश्न होता. असगर पटेल, राम कोंबडे, महादेव बरुरे, विक्रांत गोजमगुंडे यांच्याबरोबर दीपक सूळ यांच्याही नावाची चर्चा होती. पण सूळ यांचे नाव फारसे आघाडीवर नव्हते. गेल्या चार वर्षांपासून पालिकेतील पदाधिकाऱ्यांचा वचक हरविलेला होता. महापौर म्हणून गाडा हाकेल असा हुकमी एक्का दोन्ही महापौरांना पेलविता आला नव्हता. नेमकी हिच बाब हेरून श्रेष्ठींनी ऐनवेळी सारी नावे बाजूला ठेवून दीपक सूळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये मात्र अनेकांनी भुवया उंचावल्या. ‘वचक’ या दृष्टीने घेतलेल्या या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये मात्र चांगलीच अस्वस्थता पसरल्याचे चित्र आहे. याची कारणेही तशीच आहेत. सूळ यांच्या नावाची घोषणा होताच सेनेच्या रवि सूडे यांनी ‘हा तर संजय सावंतांनी डोक्यावर ठेवलेला हात’ अशी दिलेली प्रतिक्रिया सर्वात बोलकी आहे. उमेदवारी घोषित व्हायच्या आधी काही दिवस शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत हे सूळ यांच्या घरी जाऊन ‘पाहुणचार’ घेऊन आले होते. याची दखल काँग्रेसने घेतली असा तर्क सुडे यांनी काढला. हा काही त्यांच्या एकट्याचा तर्क नाही. काँग्रेसमधील एका नगरसेवकांनेही नाव न छापण्याच्या अटीवर जर विरोधी पक्षांच्या संपर्कात राहील्याने पदे मिळणार असतील तर आम्हीही इथून तशीच निष्ठा ठेवावी का ? असा सवाल केला.
हीच का श्रेष्ठींची निष्ठावंतांना फळे ?
सूळ यांच्या गळ्यात घातलेली महापौर पदाची माळ हा काही पहिला धक्का देणारा निर्णय नाही. यापूर्वी विधानसभेच्या आधी देशमुखांच्या विरोधात माजी आमदार शिवाजीराव कव्हेकरांनी भूमिका मांडल्यानंतरही प्रतिभातार्इंना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले गेले. बब्रुवान काळे यांच्या निष्ठेवर शंका घ्यायला शिताचीही गरज नाही. पण जिभेचा दांडपट्टा हेच मोठे अस्त्र असलेले वैजनाथ दादा आमदार झाले. विमानतळाच्या मुद्यांवरुन पत्रकबाजी केल्यानंतरही डी. सी. देशमुख मांजराचे चेअरमन झाले. बाकीच्या जाऊद्या, पण खुद्द बाभळगावात काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात पंचायत समिती लढविल्यानंतरही १०० मताने पडलेल्या सतीश कुटवाडेंना गावचे सरपंच केले. मग सांगा निष्ठा कशाशी खातात ? असा सवाल एक निष्ठावंत काँग्रेस नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना केला.
सूळ यांच्यापुढे अग्निदिव्य !
काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांना मागे टाकून महापौर पदावर विराजमान होऊ पाहणाऱ्या दीपक सूळ यांच्यापुढे आता अग्निदिव्य आहे. लातूरचे प्रथम नागरिक होण्याचे भाग्य ही काही साधीसुदी गोष्ट नाही. शिवराज पाटील चाकूरकर, चंद्रशेखर बाजपेयी, जनार्दन वाघमारे, मन्मथअप्पा लोखंडे, प्रदीप राठी, व्यंकट बेद्रे, एस. आर. देशमुख, अबुबकर सिद्दीकी, विक्रम गोजमगुंडे अशा दिग्गज नेत्यांनी ही पदे भूषवून पदांचा मान वाढविला आहे. पक्षांतर्गत खदखद शांत करुन सर्वांना सोबत घेऊन पाण्याच्या संकटातून लातूरला बाहेर काढण्याचे दिव्य त्यांच्यासमोर आहे.