मुख्यमंत्री शिंदे यांच्या फोननंतर अब्दुल सत्तार यांची भाजपा विरोधाची तलवार म्यान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 02:00 PM2024-11-07T14:00:48+5:302024-11-07T14:01:32+5:30
अब्दुल सत्तार आणि भाजपा यांच्यात वाद वाढल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर सत्तार यांनी नरमाईची भूमिका घेतली.
सिल्लोड : लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून भारतीय जनता पक्षातील नेत्यांवर आक्रमक शाब्दिक हल्ले करणारे मंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आल्यानंतर आपली तलवार म्यान केली आहे. तशी माहिती त्यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
लोकसभा निवडणुकीत जालना विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यापासून राज्यातील महायुती सरकारमधील अल्पसंख्याक व पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी दानवे यांच्यावर प्रखर टीका केली. तसेच दानवे यांचा आपणच पराभव केल्याचे सांगितले होते. त्यानंतर दानवे यांनी सिल्लोडचा पाकिस्तान होतोय, असा आरोप केला. तसेच सत्तार यांना औरंगजेबाची उपमा दिली होती. त्यानंतर सत्तार यांनी विधानसभा निवडणुकीत कन्नड, फुलंब्री, भोकरदन आदी आपण लोकसभेची पुनरावृत्ती करू असे म्हटले होते. त्यानुसार त्यांनी समर्थकांच्या बैठका घेऊन त्यांना कानमंत्रही दिला होता.
हा वाद वाढल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर सत्तार यांनी नरमाईची भूमिका घेतली. धोत्रा येथील येथील प्रचारसभेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा त्यांना, ‘विधानसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे व तुमचे कॉम्प्रोमाइज झाले का?’ असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्याने मी बंडोबांना आवरले आहे. कन्नड, फुलंब्री, भोकरदनसह ४ ते ५ मतदारसंघांतील तलवारी म्यान केल्या आहेत. आता भाजपबाबतचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेतील, असे सत्तार म्हणाले.