समिती अध्यक्ष, सदस्य नागपूरला गेल्यामुळे अहवाल लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 01:24 AM2018-07-18T01:24:15+5:302018-07-18T01:25:27+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नापास विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वाटप केल्याप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीचा मंगळवारीच (दि. १७) अहवाल देण्याचे बंधन असतानाही हा अहवाल विद्यापीठाला मिळू शकला नाही. समिती अध्यक्ष आणि एक सदस्य दुपारीच नागपूरला रवाना झाल्यामुळे चौकशीचे कामकाज पूर्ण होऊ शकले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नापास विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वाटप केल्याप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीचा मंगळवारीच (दि. १७) अहवाल देण्याचे बंधन असतानाही हा अहवाल विद्यापीठाला मिळू शकला नाही. समिती अध्यक्ष आणि एक सदस्य दुपारीच नागपूरला रवाना झाल्यामुळे चौकशीचे कामकाज पूर्ण होऊ शकले नाही. आता समिती अध्यक्ष २० जुलै रोजी नागपूरहून परतल्यानंतरच यासंदर्भात निर्णय होईल.
‘लोकमत’ने १४ जुलै रोजी उघडकीस आणलेल्या ‘नापास विद्यार्थ्यांना पदवी’ प्रमाणपत्र वाटप प्रकरणाच्या चौकशीसाठी अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. ही समिती दोन
दिवसांत अहवाल देणार असल्याची घोषणा कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी पत्रकार परिषदेत केली
होती.
या समितीने पहिल्या दिवशी कामकाज केले. दुसऱ्या दिवशी डॉ. सरवदे आणि सदस्य डॉ. मजहर फारुकी यांनी सकाळच्या सत्रात कामकाज केल्यानंतर ते दुपारी नागपूरला रवाना झाले. नागपूर येथे १८ व १९ जुलै रोजी राज्यभरातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, प्रकुलगुरू, अधिष्ठाता आणि कुलसचिवांची बैठक उच्चशिक्षण विभागाने आयोजित केली आहे. या बैठकीसाठी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे, प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्यासह चार अधिष्ठाता मंगळवारी दुपारीच रवाना झाले. यामुळे चौकशी अहवाल सादर करण्यासाठी शुक्रवारचा दिवस उजडणार असल्याचे स्पष्ट
झाले.
या समितीचे अध्यक्ष व एक सदस्य नागपूरला गेल्यानंतर समितीचे सदस्य व व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे यांनी सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत अनेक कर्मचारी, अधिका-यांचे इनकॉमेरा जबाब घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.