मंत्रीमंडळ बैठकीवर आदर्श बँक ठेवीदारांचा मोर्चा; आंदोलकांनी बॅरिगेटिंग तोडल्याने गोंधळ
By सुमित डोळे | Published: September 16, 2023 01:29 PM2023-09-16T13:29:26+5:302023-09-16T13:32:33+5:30
आंदोलक गुंतवणूक परत देण्याच्या मागणीसाठी आमखास मैदानाच्या दिशेने रवाना
छत्रपती संभाजीनगर: आदर्श पतसंस्थेत घोटाळा प्रकरणानंतर ठेवीदार आपल्या पैस्यांसाठी आक्रमक झाले आहेत. आज मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात ठेवीदारांचा मोर्चा काढण्यात आला. यावेळी बॅरिगेटिंग ओलांडून खासदार, आंदोलक आमखास मैदानाच्या दिशेने रवाना.
खासदार इम्तियाज जलील आणि आंदोलकांनी मंत्र्यांनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारावे. ठेवीदार आणि नागरिकांना आश्वस्त करावं अशी मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी खासदार जलील आणि आंदोलकांना मागे थांबण्याची विनंती केली आहे. मात्र, आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला.
आदर्श बँक घोटाळ्यामुळे गुंतवणूक अडकली; बॅरिगेटिंग ओलांडून खासदार जलील, आंदोलक मंत्रिमंडळ बैठकीच्या ठिकाणाकडे रवाना pic.twitter.com/TojhRS0B40
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) September 16, 2023
आदर्श बँकेत घोटाळ्यामुळे अनेक ठेवीदार चिंतेत आहेत. छोट्या गुंतवणूकदारांचे कष्टाचे पैसे यात अडकले आहेत. यामुळे गुंतवणूकदार आक्रमक आहेत. आदर्श पंतसंस्थेचे अध्यक्ष मानकापे यांची संपत्ती विकून आमची गुंतवणूक परत द्यावी अशी मागणी आंदोलक करत आहेत.
सहकार मंत्र्यांनी निवेदन घ्यावे
आम्ही हमखास मैदानावर थांबतो सहकार मंत्र्यांनी तेथे येवून निवेदन घ्यावे. जर सरकार ४० हजार कोटी देणार असेल तर या गरीब गुंतवणूकदारांना देखील त्यांचे पैसे मिळावेत, अशी मागणी खा. जलील यांनी केली आहे. मंत्री फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत असताना गोरगरीब रस्त्यावर आहे. मंत्र्यांना यांच्यासाठी वेळ नाही का. मंत्री आले नाही तर आम्ही अधिक आक्रमक आंदोलन करू असा इशारा देखील खा. जलील यांनी दिला. तर पोलिसांनी आंदोलकांना भडकल गेट येथे थांबण्याची विनंती केली आहे. मात्र आंदोलक आणि खा. जलील मंत्रिमंडळ बैठक सुरु असलेल्या हमखास मैदानाकडे रवाना झाले आहेत.