दहीहंडीनंतर शहराला गणेशोत्सवाचे वेध
By Admin | Published: August 24, 2014 01:19 AM2014-08-24T01:19:54+5:302014-08-24T01:49:59+5:30
औरंगाबाद : जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा केल्यानंतर आता शहराला गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत.
औरंगाबाद : जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा केल्यानंतर आता शहराला गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. बड्या सार्वजनिक गणेश मंडळांनी मंडप उभारणी सुरू केली आहे. काही मंडळांनी देखाव्याच्या मूर्तीही आणल्या आहेत. भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करून आता तरी जोरदार पाऊस पडू दे, अशी प्रार्थना करण्यात येणार आहे.
शहरातून फेरफटका मारला असता काही ठिकाणी मंडप उभारणी सुरू असल्याचे दिसत आहे. यामुळे काही दिवसांवर गणेशोत्सव आल्याची जाणीव होत आहे. अवघ्या ७ दिवसांनंतर गणरायाचे घरोघरी आगमन होणार आहे. गणरायाच्या स्वागतासाठी बाजारपेठही सजली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनीही मंडप उभारणी, कमानी उभारणीला सुरुवात केली. शहरातील बड्या सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये दरवर्षी उत्कृष्ट देखावा तयार करण्याची चढाओढ असते. त्यातूनच धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवरील देखावे उभारले जातात. शहरातील ग्रामदैवत संस्थान गणपती मंदिर परिसरात कमानी उभारणे सुरू झाले आहे. तसेच शहागंज चौकातही देखाव्यासाठी मोठे स्टेज उभारले जात आहे. यासंदर्भात प्रफुल्ल मालानी म्हणाले, दरवर्षी संस्थान गणपती ट्रस्टच्या वतीने धार्मिक देखावे सादर केले जातात. यंदा महादेवाच्या तांडव नृत्याच्या महिम्यावर आधारित देखावा तयार करण्यात येणार आहे. यासाठी महादेवाची २० फुटांची मूर्ती आणण्यात येणार आहे. यासाठी २० बाय ३० फुटांचा भव्य मंडप उभारला जात आहे. भव्यदिव्य देखावा तयार करणाऱ्या जाधवमंडी येथील यादगार गणेश मंडळाचे मंडप उभारणीचे काम पूर्ण झाले असून, आता देखाव्याची तयारी सुरू केली आहे. यंदा मंडळ ४९ वा गणेशोत्सव साजरा करीत आहे. यानिमित्त रामायणातील ‘कुंभकर्णाची झोप’ या कथेवर आधारित देखावा सादर करण्यात येणार असल्याची माहिती गोपी घोडेले यांनी दिली. गुलमंडीवरील अष्टविनायक गणेश मंडळ ३४ वर्षांची परंपरा कायम ठेवत यंदाही धार्मिक देखावा उभारत आहे. यासंदर्भात दयाराम बसैये यांनी सांगितले की, मंडपाची उभारणी सुरू झाली आहे. यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा देखावा आम्ही सादर करणार आहोत. धार्मिक देखावे यंदाच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य ठरणार आहे. याशिवाय शहागंज, गांधी पुतळा परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळ, धावणी मोहल्ल्यातील बालकन्हैैया गणेश मंडळानेही तयारी सुरूकेली आहे.