महिला रुग्णाच्या मृत्यूनंतर घाटीत गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:14 AM2018-10-16T00:14:13+5:302018-10-16T00:15:17+5:30
औरंगाबाद : एका महिला रुग्णाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी संताप व्यक्त केल्याने घाटीत सोमवारी गोंधळ ...
औरंगाबाद : एका महिला रुग्णाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी संताप व्यक्त केल्याने घाटीत सोमवारी गोंधळ निर्माण झाला. नातेवाईकांनी मारहाण केल्याचा आरोप डॉक्टरांनी केला, तर डॉक्टरांनीच मारहाण केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.
वनिता दादाराव शेंडगे (२९) असे मृत महिला रुग्णाचे नाव आहे. स्वाईन फ्लूसदृश आजारामुळे वनिता यांच्यावर खाजगीत उपचार सुरू होते. उपचारासाठी व्हेंटिलेटरचा खर्च परवडत नसल्याने १३ आॅक्टोबर रोजी नातेवाईकांनी त्यांना घाटीतील स्वाईन फ्लू वॉर्डात दाखल केले. उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी वनिता शेंडगे यांचा मृत्यू झाला. दादाराव शेंडगे यांनी सांगितले, डॉक्टरांनी वेळीच उपचार करण्याकडे दुर्लक्ष केले. त्यांच्यावर रविवारी उपचार सुरू करण्यात आले. रुग्णाची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले; परंतु भावाने प्रकृतीबाबत विचारणा केली, तेव्हा डॉक्टरांनी वाद घातला. त्यानंतर अर्ध्या तासात रुग्णाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा जाब विचारताच डॉक्टरांनी भावाला मारहाण केल्याचा आरोप दादाराव शेंडगे यांनी केला. परीक्षा असतानाही रुग्णालयात आलो होतो; परंतु रुग्णाच्या प्रकृतीची विचारणा के ल्यावरून डॉक्टरांनी मारहाण केल्याचे भगवान शेंडगे यांनी फाटलेला शर्ट दाखवित सांगितले.
उपचारासाठी पूर्ण प्रयत्न
घटनेनंतर निवासी डॉक्टर आणि रुग्णाचे नातेवाईक बेगमपुरा पोलीस ठाण्यात जमा झाले. डॉक्टरांनी मारहाण करणाºयांना अटकेची मागणी केली. रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी डॉक्टरांना स्टूल मारण्याचा प्रयत्न केला, असे घाटीतील डॉक्टरांचे म्हणणे आहे, तर डॉक्टरांनीच मारहाण केल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे, असे सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांनी सांगितले. आम्ही नातेवाईकांना मारहाण केली नव्हे तर स्वत:चा बचाव केला. रुग्णांच्या उपचारासाठी डॉक्टर पूर्ण प्रयत्न करीत असतात; परंतु नातेवाईक डॉक्टरांवर राग काढत असल्याचे निवासी डॉक्टरांनी म्हटले.
२४ तासांत दुसरी घटना
वॉर्ड क्रमांक ८-९ मध्ये दाखल रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर रविवारी रात्री नातेवाईकांनी दोन डॉक्टरांना मारहाण केली होती. उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत मेडिसिन विभागात २४ तासांत डॉक्टरांना मारहणीची सोमवारी दुसरी घटना घडली.