अकरा दिवसानंतरही खुनाचे कारण अस्पष्टच
By Admin | Published: January 15, 2017 01:13 AM2017-01-15T01:13:20+5:302017-01-15T01:14:44+5:30
अंबड : सुमित्रा होंडे खून प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या विलास होंडे याची पोलिस कोठडी संपल्यानंतर शुक्रवारी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
अंबड : सुमित्रा होंडे खून प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या विलास होंडे याची पोलिस कोठडी संपल्यानंतर शुक्रवारी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यामुळेच दहा दिवस पोलिसांच्या ताब्यात असलेल्या विलासकडून खुनामागचे नेमके कारण व इतर माहिती काढून घेण्यास पोलिसांना अपयश आल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.
सुमित्रा होंडे यांची अंबड शहरातील राहत्या घरी पती सतीश होंडे यांच्या परवानाधारक रिव्हॉल्वरने गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची घटना २ जानेवारी रोजी उघडकीस आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक अजित पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली. याचबरोबर त्यांनी घटनेच्या तपासावर सातत्याने लक्ष ठेवले. तपासाला गती मिळावी यासाठी त्यांनी या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सोनुने यांच्याकडे सोपविला. मात्र, तपास कामातील दिरंगाईचा फायदा घेत विलास होंडे याने पोलिस कोठडी संपेपर्यंत खुनाचे नेमके कारण पोलिसांना कळू दिले नाही. १८ वर्षे ३ महिने वय असणाऱ्या व कोणत्याही गुन्ह्याचे रेकॉर्ड नसणाऱ्या विलास होंडेसारख्या महाविद्यालयीन युवकाकडून खुनाचे नेमके कारण काढून घेण्यात पोलिस अपयशी ठरल्याने आता पोलिसांच्या कार्यपध्दतीवरतच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. होंडे कुटुंबिय जिल्ह्यातील प्रतिष्ठितांपैकी एक असल्याने या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विलासने खुनाची कबुली दिल्यानंतर तो खुनाची दररोज वेगवेगळी कारणे सांगायचा. शिवाय सुमित्रा होंडे यांचा नियोजनबध्द पध्दतीने केलेला खून एकटा विलास करु शकत नाही. याकामी त्याला नक्कीच आणखी कोणाचे तरी सहकार्य असले पाहिजे, असे मुद्दे उपस्थित करीत पोलिसांनी विलास हा तपासात सहकार्य करीत नसल्याने त्याची नार्कोटेस्ट करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही न्यायालयाकडे केली होती. मात्र, आता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली असून, भल्या-भल्यांना बोलते करणारे पोलिस विलास होंडे याच्या बाबतीतच कमी कसे पडले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (वार्ताहर)