ससूनमधून पळाल्यानंतर ललित पाटीलचा गुजरातनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये होता मुक्काम

By सुमित डोळे | Published: October 28, 2023 12:16 PM2023-10-28T12:16:23+5:302023-10-28T12:18:21+5:30

कारखान्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी मराठवाड्यात होते मोठे ललित पाटीलचे स्वतंत्र नेटवर्क

After escaping from Sassoon, Lalit Patil stayed in Chhatrapati Sambhajinagar after Gujarat | ससूनमधून पळाल्यानंतर ललित पाटीलचा गुजरातनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये होता मुक्काम

ससूनमधून पळाल्यानंतर ललित पाटीलचा गुजरातनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये होता मुक्काम

छत्रपती संभाजीनगर : नाशिक, सोलापूर प्रमाणेच शहरातही कोकेन, मेफेड्रोनच्या कारखान्यांच्या वृत्ताने संपूर्ण राज्याला हादरून टाकले. मात्र, नाशिकमध्ये कारखाना चालवणाऱ्या कुख्यात ड्रग्ज माफिया ललित पाटील याचेही शहरात स्वतंत्र नेटवर्क असल्याचे समोर आले आहे. २ ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर तो पहिले गुजरातमधील मित्रांकडे गेला होता. तेथून बंगळुरूला पळून जाण्याआधी त्याने शहरात मुक्काम ठोकला. जवळपास १२ तास थांबल्यानंतर तो पुढे रवाना झाला. या दरम्यान तो कशासाठी थांबला हाेता, कोणाला भेटला, असे गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

२२ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या कारखान्यांनी राज्याला हादरून टाकले. त्यापूर्वी ३० सप्टेंबर रोजी ससून रुग्णालयाबाहेर पुण्याच्या गुन्हे शाखेने अमली पदार्थांचा साठा जप्त केला होता. त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी ड्रग्ज माफिया ललित पाटीलने ससून रुग्णालयातून पळ काढला. या घटनेनंतर राज्यभरात अमली पदार्थांच्या रॅकेटचा गंभीर प्रश्न नव्याने चर्चेत आला. सोलापूर, कोल्हापूर, नाशिक पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमध्ये कोकेन व मेफेड्रोनच्या निर्मितीचे कारखानेच उघडकीस आले.

गुजरात राज्याचे कनेक्शन येथेही ?
ललितने पळ काढल्यानंतर तो सर्वप्रथम नाशिकला गेला. तेथे काही दिवस थांबून इंदूर, गुजरातला गेला. पुणे पोलिसांच्या माहितीनुसार, गुजरातमध्ये ललितचे नातेवाईक राहतात. तसेच, तेथील ड्रग्ज माफियांशी घनिष्ठ संबंध होते. त्यांना भेटून पुन्हा तो नाशिक, धुळे मार्गे छत्रपती संभाजीनगर मार्गे कर्नाटकमध्ये गेला. शहरात समोर आलेल्या अमली पदार्थांच्या रॅकेटमध्ये गुजरात राज्याचेच मुख्य कनेक्शन निघाले. ललित देखील गुजरातवरून शहरात आला. येथे तो जवळपास १० ते १२ तासांच्या मुक्कामात त्याच्या जुन्या नेटवर्कमधील साथीदारांना भेटल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. मुंबई, पुणे पोलिस त्या दिशेने आता तपास करत आहेत.

कच्चा माल मराठवाड्यातून
ललित व त्याचा भाऊ कोकेन निर्मितीसाठी लागणारा बहुतांश कच्चा ज्यात विनाबिलाचे औषध, विविध रसायने मराठवाड्यातून घेत असल्याचेही पुणे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे ललितने पळून गेल्यानंतर मराठवाड्यातील या नेटवर्कच्या तो संपर्कात राहिल्याचा दाट संशय तपास पथकाला आहे.

Web Title: After escaping from Sassoon, Lalit Patil stayed in Chhatrapati Sambhajinagar after Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.