बिल न मिळाल्याने मनपात तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2017 12:03 AM2017-06-20T00:03:52+5:302017-06-20T00:06:56+5:30
औरंगाबाद : वारंवार विनंती करूनही विकासकामांचे बिल मिळत नसल्याचा आरोप करीत माजी नगरसेवक एकबाल मुजाहेद यांचा मुलगा शहारेख याने सोमवारी सायंकाळी महापालिकेच्या लेखा विभागात तोडफोड केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : वारंवार विनंती करूनही विकासकामांचे बिल मिळत नसल्याचा आरोप करीत माजी नगरसेवक एकबाल मुजाहेद यांचा मुलगा शहारेख याने सोमवारी सायंकाळी महापालिकेच्या लेखा विभागात चक्क तोडफोड केली. या घटनेमुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली होती. रात्री उशिरापर्यंत मनपा प्रशासनाकडून कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नव्हती.
महापालिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. विकासकामांची देयके ५० कोटींहून अधिक बाकी आहेत. उपलब्ध निधीतून ज्येष्ठता यादीनुसार कंत्राटदारांना हळूहळू बिले अदा करण्यात येत आहेत. रमजान ईद डोळ्यासमोर ठेवून लेखा विभागाने प्रत्येक कंत्राटदाराला काहीतरी निधी मिळावा या दृष्टीने नियोजनही सुरू केले आहे. कंत्राटदारांना बिले मिळत नसल्याने वॉर्डातील विकासकामे ठप्प झाल्याचा आरोप अधूनमधून पदाधिकारी, नगरसेवकांकडूनही करण्यात येत आहे. ठराविक राजकीय मंडळींनी सांगितलेली बिले काढण्यात येत असल्याचा आरोपही मागील आठवड्यात करण्यात येत होता. लेखा विभागातील बिले मागील काही दिवसांपासून वादातच अडकली आहेत. त्यातच सोमवारी सायंकाळी माजी नगरसेवक एकबाल मुजाहेद यांचा मुलगा शहारेख याने ५.३० वाजता कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली की, माझे बिल मिळाले नाही. कर्मचाऱ्यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वीच कंत्राटदारांची बहुतांश बिले बँकांकडे पाठविण्यात आली आहेत. आज किंवा उद्या तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. शहारेख काहीही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्याने मुख्य लेखाधिकारी राम साळुंके यांच्या कक्षासमोरील खुर्च्यांची आदळआपट करून लेखा विभागात एकच खळबळ उडवून दिली. काही वेळानंतर तो बाहेर गेला. परत आला आणि परत तोडफोड सुरू केली. त्याचा हा रुद्रावतार पाहून लेखा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काढता पाय घेतला. मात्र, या तोडफोडप्रकरणी मनपा प्रशासनाकडून कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही, हे विशेष.