पाच दिवसांनी परीक्षा संचालक मिळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 01:19 AM2017-11-03T01:19:56+5:302017-11-03T01:19:59+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाला अखेर संचालक मिळाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाला अखेर संचालक मिळाले आहेत. पाच दिवसांपासून परीक्षा संचालकपदाचा प्रभारी पदभार घेण्यासाठी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी अनेक प्राध्यापकांना विचारणा केली. मात्र पदभार घेण्यासाठी कोणीही तयार होत नसल्यामुळे उपकुलसचिव डॉ. दिगंबर नेटके यांना पदभार घेण्याचे आदेश कुलगुरूंनी दिले. त्यानुसार डॉ. नेटके यांनी सायंकाळी उशिरा पदभार स्वीकारला.
विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. सतीश दांडगे यांनी शुक्रवारी (दि.२७ आॅक्टोबर) पदाचा राजीनामा दिला होता. कुलगुरूंनी अनेक वेळा विनंती करूनही डॉ. दांडगे यांनी पदभार कायम ठेवण्यास नकार दिला. तेव्हापासून गुरुवारपर्यंत कुलगुरूंनी विद्यापीठात कार्यरत असलेल्या ज्येष्ठ प्राध्यापकांना पदभार घेण्यासाठी विचारणा केली होती. मात्र एकही प्राध्यापक पदभार स्वीकारण्यास राजी होईना.
यानंतर कुलगुरूंनी परीक्षा विभागातील उपकुलसचिव डॉ. प्रताप कलावंत यांनाही विचारणा केली. मात्र, डॉ. कलावंत यांनीही उत्सुकता दाखविली नाही. यातच आठ दिवसांनी पदवी परीक्षांना सुरुवात होणार आहे.
या परीक्षांचे अद्यापही नियोजन झालेले नाही. यामुळे परीक्षा विभागाचा दीर्घ अनुभव असलेले व परीक्षा संचालकपद भूषविलेले डॉ. दिगंबर नेटके यांनाच पदभार स्वीकारण्याचे आदेश कुलगुरूंनी दिले. सुरुवातीला डॉ. नेटके यांनीही असमर्थता दर्शविली होती. मात्र, कुलगुरूंचे आदेश असल्यामुळे त्यांना पदभार घ्यावा लागला आहे.
परीक्षा विभागात मागील काही दिवसांपासून सुरू असलेला गोंधळ कमी आणि परीक्षा प्रक्रिया राबविण्याचे आव्हान डॉ. नेटके यांच्यासमोर आहे.