डोळ्याच्या शस्त्रक्रियेपूर्वी भूल दिल्यानंतर बालिक ा गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 10:57 PM2019-02-11T22:57:18+5:302019-02-11T22:59:02+5:30
घाटी रुग्णालयात डोळ्याच्या तिरळेपणाच्या शस्त्रक्रियेसाठी भूल दिल्यानंतर (अनेस्थेशिया) एका साडेतीन वर्षीय बालिकेची प्रकृती गंभीर झाल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकारामुळे मुलीला उपचारासाठी आयसीयूत दाखल करण्यात आले असून, भूल देताना डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात डोळ्याच्या तिरळेपणाच्या शस्त्रक्रियेसाठी भूल दिल्यानंतर (अनेस्थेशिया) एका साडेतीन वर्षीय बालिकेची प्रकृती गंभीर झाल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकारामुळे मुलीला उपचारासाठी आयसीयूत दाखल करण्यात आले असून, भूल देताना डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
केतकी बालाजी घोरपडे (रा. गारखेडा) असे या बालिकेचे नाव आहे. यासंदर्भात तिचे वडील बालाजी घोरपडे यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने यांच्याकडे एका अर्जाद्वारे तक्रार दिली आहे. उजव्या डोळ्याच्या तिरळेपणावरील उपचारासाठी शनिवारी केतकीला घाटीत दाखल करण्यात आले. तिच्यावर सोमवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. शस्त्रक्रियेसाठी दुपारी दीड वाजेच्या सुमारास केतकीला शस्त्रक्रियागृहात नेण्यात आले. दरम्यान तीन वाजेच्या सुमारास केतकीची प्रकृती बिघडल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
भूल दिल्यानंतर तिला खोकला लागला. अस्थमासारखा अटॅक आला. त्यामुळे तिला भुलीची रिअॅक्शन झाल्याचे नातेवाईकांनी म्हटले. या प्रकारामुळे शस्त्रक्रिया रद्द करून केतकीला उपचारासाठी आयसीयूत दाखल करण्यात आले. ती सध्या व्हेंटिलेटरवर आहे. भूल देताना डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप बालाजी घोरपडे यांनी केला आहे.
घाटीतील नेत्ररोग विभागप्रमुख डॉ. वर्षा नांदेडकर म्हणाल्या, या बालिकेवर युनिट-३ यांच्याकडून उपचार सुरू होते. शस्त्रक्रियेपूर्वी तिला भूल बसत नसल्याची आणि त्रास होत असल्याची माहिती प्राप्त झाली. या सगळ्याची मी माहिती घेतली. प्रकृती बिघडल्यामुळे बालिका व्हेंटिलेटवर आहे.
कारण सांगता येणार नाही
या बालिकेला शस्त्रक्रियेपूर्वी भुलीचे इंजेक्शन देण्यात आले. परंतु अचानक तिची प्रकृती बिघडली. तिच्यावर उपचार सुरू आहेत. प्रकृती नेमकी कशामुळे बिघडली, याचे कारण आताच सांगता येणार नाही.
-डॉ. कैलास झिने, वैद्यकीय अधीक्षक, घाटी