गंगापुरात पंधरा दिवसांनंतर रुग्णवाढीला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:04 AM2021-04-28T04:04:47+5:302021-04-28T04:04:47+5:30
गेल्या काही दिवसांत तालुक्याला कोरोनाने विळखा घातल्याने रुग्णवाढीचा वेग दुप्पट झाला होता. जिल्ह्यात सर्वाधिक ५ हजार ६८४ रुग्ण गंगापूर ...
गेल्या काही दिवसांत तालुक्याला कोरोनाने विळखा घातल्याने रुग्णवाढीचा वेग दुप्पट झाला होता. जिल्ह्यात सर्वाधिक ५ हजार ६८४ रुग्ण गंगापूर तालुक्यात असून, २३ एप्रिल रोजी एकाच दिवशी २०२ तर २४ रोजी १४९ रुग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते; मात्र २५ एप्रिलपासून रुग्णवाढीचा वेग कमी होत गेला. २५ एप्रिल रोजी ९० तर २६ रोजी ८१ रुग्ण आढळले. मंगळवारी तालुक्यात एकूण २३ रुग्ण आढळले असून, गत पंधरा दिवसातील हा सर्वात कमी आकडा असल्याने दिलासा मिळाला आहे. तालुक्यात आतापर्यंत गंगापूर, लासुर, रांजणगाव, वाळूज व भेंडाळा येथे अनुक्रमे ६४४,२६७, २२५ , १६१ व ८० सर्वाधिक रुग्ण आढळून आले. सध्या १ हजार १२३ रुग्णांवर उपचार चालू असून, उपचारादरम्यान ९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तालुक्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७० टक्के एवढे आहे. संचारबंदीची कडक अंमलबजावणी होत असल्याने रुग्णवाढ मंदावली असल्याचे बोलले जात आहे.