चार दिवसांनंतर एसटी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 01:07 AM2017-10-22T01:07:03+5:302017-10-22T01:07:03+5:30
: राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांनी पुकारलेला संप अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मागे घेतला आणि लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांनी पुकारलेला संप अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मागे घेतला आणि लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला. औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी (दि.२१) पहाटे ४ वाजेपासून बससेवा सुरळीत झाली. तब्बल चार दिवसांनंतर एसटी बसस्थानकाबाहेर पडून रस्त्यावर धावली. मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानक सकाळपासूनच प्रवाशांच्या गर्दीने गजबजून गेल्याचे पाहायला मिळाले.
एसटी महामंडळातील कर्मचा-यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणीसह सातवा वेतन आयोग व इतर मागण्यांसाठी १७ आॅक्टोबरपासून बेमुदत संप पुकारण्यात आला. तब्बल चार दिवस हा संप चालला. संपाला कर्मचा-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने या चार दिवसांत औरंगाबाद जिल्ह्यातील बसस्थानकांतून एकही बस रस्त्यावर आली नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाने अखेर शुक्रवारी रात्री उशिरा संप मागे घेण्यात आला.
संप मागे घेण्यात आल्याची माहिती मिळताच रात्री उशिरा औरंगाबाद विभागातील सर्व आगार व्यवस्थापकांना बससेवा सुरू करण्याचे नियोजन करावे,अशी सूचना महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी केल्या. सूचनेनुसार वायुवेगाने घडामोडी घडत पहाटे ४ वाजेपासून विभागातील बससेवा सुरू करण्यात आली. यामध्ये सर्वप्रथम मध्यवर्ती बसस्थानकातून औरंगाबाद-सोलापूर, औरंगाबाद-पुणे बस बाहेर पडल्या. त्यानंतर इतर मार्गांवरील बससेवा सुरू झाल्या. चार दिवसांपासून ओस पडलेले मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानक शनिवारी प्रवाशांच्या गर्दीने फुलून गेले. दोन्ही बसस्थानकांत विविध ठिकाणी जाणाºया प्रवाशांची दिवसभर गर्दी दिसून आली.
गोरगरीब आणि ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली एसटी बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांच्या चेह-यावरही आनंदाची लकेर पाहायला मिळाली. बससेवा सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळाल्याच्या भावना प्रवाशांनी व्यक्त केल्या. पाचव्या दिवशीही संप चालू राहील, या अपेक्षेने खाजगी वाहतूकदारांनी गर्दीच्या मार्गावर अधिक वाहने सज्ज ठेवली होती; परंतु त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरल्या गेले.